संत तुकाराम

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती।
चालविसी हाती धरुनिया ॥
चालों वाटे आम्ही तुझाचि आधार ।
चालविसी भार सवें माझा ॥
बोलों जाता बरळ करिसी ते नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ॥
अवघे जन मज झाले लोकपाळ ।
सोइरे सकळ प्राणसखे॥
तुका म्हणे आता खेळतों कौतुके ।
जातें तुझे मुख अंतर्बाही ॥


या अभंगात संत तुकाराम म्हणतात, हे परमेश्वरा, जैथे जाने तेथे माझ्यासमवेत राहून तू माझा सोबती होतोस आणि माझा हात प्रेमपूर्वक धरून मला चालवतोस. आम्ही या भक्तीमार्गाने चाललो आहोत, त्यात तुझाच एक आधार आहे. तूच माझा सर्व योगक्षेम चालवतो आहेस. माझ्या मुखातून काही वेडेवाकडे शब्द निघाले तर ते तू नीट, सरळ करतोस. परमेश्वरा, आमच्या मनातली लाज दूर करून तू आम्हाला धीट बनविले आहेस. सर्व लोक मला लोकपाळाप्रमाणे झाले असून ते प्राणसखे व सोयरेच आहेत. संत तुकाराम म्हणतात, तुझ्या सहवासाचे सुख आता अंतर्बाह्य मिळाल्यामुळे आम्ही आता या प्रेमसुखात कौतुकाने खेळत आहेत. देव भक्ताचा सर्व भार वाहतो. त्याचा योगक्षेम चालवतो. ‘‘योगक्षेमं वहाम्यहम्’’ हे गीतेतील तत्व संत तुकारामांनी अधोरेखित केले आहे. क्षणोक्षणी चराचरी तोच सोबत असतो. आपल्याला आयुष्यात योग्य मार्ग दाखवतो. समर्थ, धीट बनवतो. सर्व लोक एकमेकांचे सोयरे आहेत ही विश्वात्मक जाणीव तुकारामांनी व्यक्त केली आहे. संतपण ते हेच. परमेश्वराचे अस्तित्व सतत आपल्याबरोबरच असते. तो जिवलग मित्राप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतो. परमेश्वर म्हणजे मित्र, सांगाती नेहमी आपल्यासमवेत असणारा तो आपल्या हातून घडणाऱ्या चूका दुरुस्त करून आयुष्यातील वाटचालीची योग्य दिशा दाखवितो. अखंडपणे आपला आधार बनून राहातो. त्याच चैतन्यमय संग लाभला की, मनाचे आकाश विस्तारत जाते. जाणीवा समृद्ध होतात. अवघे विश्व आपलेच घर वाटते. देव भक्तांची सतत काळजी करतो. त्यांच्या आयुष्याचे सारथ्य करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अर्जुनासारखी संभ्रमावस्था निर्माण होते. भक्तसखा परमेश्वर त्या समस्यांचे निराकरण करतो. ईश्वरी कृपेची छाया लाभली की, सुखाचे सर्व दरवाजे उघडतात. त्या छायेत मन आनंदाने आाणि कौतुकाने विहरत रहाते. परमेश्वर आपला भार वाहतोच पण लहान मुलांच्या बोबड्या बोलाप्रमाणे काही चुकीचे बोल बोललो तर ते नीट सुधारून घेतो. परमेश्वरी कृपेची, त्याच्या अखंड प्रेमाची कृतज्ञ जाणीव संत तुकारामांनी नेमक्या शब्दांत व्यक्त केली आहे.


__डॉ. देविदास पोटे

Comments
Add Comment

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची

Gauri Avahan 2026 : ‘आली आली गौराई, सोन्याच्या पावलांनी’; जाणून घ्या आवाहनाचा मुहूर्त, नैवेद्य आणि विसर्जनाची तारीख

Gauri Avahan 2026 : “आली आली गौराई, सोन्याच्या पावलांनी…” या पारंपरिक गीताच्या सुरांनी आज महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

संत ज्ञानेश्वर

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फिटला

संत मुक्ताबाई

प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण। दीपें दीप पूर्ण एका तत्त्वे।। देखिले गे माये पंढरी पाटणी। पुंडलिका अंगणी