Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे याच आंदोलनात सहभागी झालेल्या एका तथाकथित नेत्याच्या 'शाही' थाटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रवक्ते सौरव दास यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते चक्क एका व्यक्तीकडून स्वतःला हवा घालत असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होत असून चौफेर टीकेची झोड उठली आहे.



जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचा एल्गार




वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे. याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. कडक उन्हाची पर्वा न करता शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.



नेत्याचा 'शाही' थाट आणि कॉफीचा आस्वाद


एकिकडे विद्यार्थी उन्हात रापताना दिसत असताना, दुसरीकडे याच आंदोलनातील एक वेगळेच आणि संतापजनक चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. समोर आलेल्या कथित व्हिडिओमध्ये, CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास हे कार्यकर्त्यांच्या गराड्यात अगदी आरामात बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात कॉफीचा कागदी कप आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्या पाठीमागे उभा असलेला एक वयोवृद्ध व्यक्ती एका मोठ्या पोस्टरच्या साहाय्याने त्यांना सतत हवा घालत आहे. गरिबांच्या हक्कांसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या नेत्याचा हा सरंजामशाही थाट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



सोशल मीडियावर संतापाची लाट


हा व्हिडिओ 'एक्स'वर वाऱ्यासारखा पसरला असून नेटकऱ्यांनी दास यांना चांगलेच धारेवर धरले आहे. "सामाजिक न्याय आणि समानतेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या या नेत्यांना १० मिनिटेही ऊन सहन होत नाही. स्वतः थंड कॉफी पीत एका गरीब आणि वृद्ध माणसाला हवा घालायला लावणे, हीच यांची क्रांती आहे का?" असा संतप्त सवाल एका युझरने विचारला आहे. तर दुसऱ्याने "या 'एलिट' लोकांचा खरा चेहरा उघड झाला असून यांना गरिबांबद्दल अजिबात आस्था नाही," अशी सडकून टीका केली आहे.



सौरव दास यांचे मौन कायम


या संपूर्ण प्रकरणावर आणि सोशल मीडियावरील वाढत्या रोषावर सौरव दास किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. माध्यमांकडून या व्हायरल व्हिडिओची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नसली तरी, या एका प्रसंगामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ आंदोलनावरून लक्ष विचलित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


दरम्यान, या सर्व राजकीय गदारोळात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी जंतरमंतर गाठून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. "मला मुळातच आंदोलने करणे पसंत नाही, पण जेव्हा न्यायाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा आपल्याला नाईलाजाने हे पाऊल उचलावेच लागते," अशी खंत वांगचूक यांनी व्यक्त केली. तसेच, देशातील सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची नितांत गरज असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात