Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आज नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.



नाशिक–पुणे रेल्वेसाठी आता नागरिकांनीच पुढे यावे


यावेळी त्यांनी जाहीर केले की, ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने नाशिक–पुणे रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नाशिककरांनी आता जागे होण्याची वेळ आली असून, या रेल्वेमार्गासाठी सर्वसामान्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. राजकारण असो की काही, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आता नागरिकांनीच पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.



आमदार तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे (Nashik–Pune) दरम्यान थेट रेल्वेमार्गाची गरज अनेक वर्षांपासून अधोरेखित होत आहे. अवघ्या १५० किलोमीटरच्या अंतरासाठी आज नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो. अनेकदा रस्ते वाहतुकीवरील ताणामुळे पुणे गाठण्यासाठी सात-सात तास लागतात. आज चाकणचा रस्ताही बंद असल्याने नाशिककरांना पुणे गाठण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवघ्या दीडशे किलोमीटरच्या अंतरासाठी ही अनास्था का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


ते पुढे म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. मूळ अपेक्षित मार्गाऐवजी शिर्डीमार्गे नियोजन करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. "पुण्याहून पुणतांबा" या म्हणीप्रमाणे ही रेल्वे झाली आहे, अशी उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींसोबतच आता सर्वसामान्य नागरिकांनी संघटितपणे दबाव निर्माण करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांनी दबाव निर्माण करून ही रेल्वे नाशिकच्या पदरात पाडून घेतली पाहिजे.



आमदार तांबे यांनी स्पष्ट केले की, पूर्वी इंडियाबुल्स प्रकल्पाच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन, भूमिका आणि पाठपुरावा केल्यानंतरच कामाला गती मिळाली. त्याचप्रमाणे नाशिक–पुणे रेल्वेच्या मागणीसाठीही लोकशक्ती उभी राहिल्यास शासनाला निर्णय घ्यावाच लागेल. विविध ठिकाणी रस्ता रोकोसह वेगवेगळ्या स्वरूपातील आंदोलने करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कनेक्टरच्या रखडलेल्या कामाकडेही लक्ष वेधले. समृद्धी महामार्गाचा नाशिककरांना अपेक्षित फायदा झालेला नाही. नाशिक ते साकूर फाटा या कनेक्टरचे टेंडर अद्याप निघालेले नाही. समृद्धी महामार्गाच्या कनेक्टरचे काम लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे. तसेच इगतपुरी–घोटी टोल आणि इगतपुरी टोल असे दोन्ही टोल भरावे लागत असल्याने नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.नाशिकला या रेल्वेमार्गाचा थेट फायदा होणार असल्याने प्रत्येक नाशिककराने या जनआंदोलनात सहभागी झाले पाहिजे. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या क्रांतिदिनाच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाशिक–पुणे रेल्वे मार्गासाठी जनदबाव निर्माण करावा, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.



समृद्धी महामार्गाचा नाशिककरांना नेमका फायदा कधी?


नाशिक–समृद्धी कनेक्टरसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले असून निधीही मंजूर आहे, मात्र नाशिक ते साकूर फाटा या कनेक्टरचे टेंडर अद्यापही निघालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत आहे. या विलंबाचा फटका नाशिककरांना बसत आहे. समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना आधी मुंबई–आग्रा महामार्गाचा टोल आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाचा टोल भरावा लागतो.


एका प्रवासासाठी दोन टोल भरावे लागत असल्याने नागरिकांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे. तसेच भरवीर टोलनाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ खर्च होतो आणि वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. या प्रश्नाकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी यापूर्वी १० जुलै २०२५ रोजी विधिमंडळात लक्ष वेधले होते. कनेक्टरचे काम तातडीने सुरू करून नाशिककरांना समृद्धी महामार्गाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, अशी त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''