Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुण्यात विविध रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



पुणे-संभाजीनगर मार्गावरील प्रस्तावित प्रकल्पामुळे पुण्याच्या वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय मिळणार आहे. शिरूर ते संभाजीनगर या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत शक्य होईल. पुढे संभाजीनगर ते नागपूर प्रवास सुमारे पाच तासांत पूर्ण करता येणार आहे. हा मार्ग पुणे आणि नागपूरला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी सुमारे १,२५० कोटी रुपयांचे काम सुरू असून, या मार्गाचे सुशोभीकरण ऐतिहासिक स्वरूपात करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.



दिल्ली-चेन्नई महामार्गावरील महाराष्ट्रातील भागात सुमारे ३२० किलोमीटर अंतर कमी होणार आहे. तसेच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. ठाणे-पुणे आणि तळेगाव-शिरूर मार्गांसाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात एका खांबावर दोन स्तरांवरील वाहतूक व्यवस्था उभारण्याची संकल्पना असून, खालच्या स्तरावर रस्ता आणि वरच्या स्तरावर मेट्रो अशी व्यवस्था प्रस्तावित आहे. मुंबई ते बेंगळुरू प्रवासाचा वेळ पाच तासांवर आणण्यासाठी १२० मीटर रुंदीचा नवीन द्रुतगती मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच वेग देण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन उद्योग, व्यापार आणि प्रवासाला चालना मिळणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.



२०३० पर्यंत पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहराच्या भविष्यातील विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे भविष्यात पुण्यातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पुणे हे देशातील प्रमुख शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून आधीपासूनच ओळखले जाते. मात्र, विकासाच्या नव्या पर्वामुळे २०३० पर्यंत पुण्याची ओळख देशातील एक आधुनिक आणि विकसित शहर म्हणून निर्माण होईल.” पुण्यात वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दुहेरी मार्गांची निर्मिती करण्यात येणार असून, या प्रकल्पात खालून रस्ता आणि वरून मेट्रो अशा दुहेरी सुविधेचे नियोजन करण्यात आले आहे. हडपसर ते उरुळी कांचनपर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित असून, या मार्गामुळे सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. दिवेघाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येथे बोगदा (टनल) उभारण्यात येणार आहे. तसेच पुरंदर विमानतळासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, पुढील तीन वर्षांत हे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे महानगर क्षेत्रात इनर आणि आउटर रिंग रोड, टाउन प्लॅनिंग तसेच नवीन उपनगरांच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत सुमारे १७३ किलोमीटर बाह्य रस्ते आणि ८० किलोमीटर अंतर्गत रस्त्यांची निर्मिती प्रस्तावित आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तळेगावकडून येणारी वाहतूक शिरूरच्या दिशेने अधिक सुलभपणे वळविणे शक्य होणार असून, पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा