शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या एका टाटा सुमो कारवर दरड कोसळल्याने बाळासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सुमो कारमध्ये १५ जण प्रवास करत होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण आहे की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. डोंगरावरून दगड कोसळल्यानंतर गाडीच्या मागील भागात आग लागली, जी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आणि जवानांनी विझवण्याचा प्रयत्न केला.
(Shimla Accident)
महामार्ग काही दिवस होता बंद
काही दिवसांपासून उदयपूर-किलाड मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यामुळे पर्यटकांची वाहने तिंदी परिसरात थांबवली जात होती. मार्ग सुरू झाल्यानंतर ही अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी मंडी जिल्ह्यातील जोगिंद्रनगर
येथील गुम्मामध्ये भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये दोन कुटुंबं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये आठवड्याभरात दोन मोठ्या दुर्घटना झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.