Dharmendra Pradhan : "मी एसीतला नाही, तर रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता!" काँग्रेसच्या टोमण्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार; राजीनाम्यानंतर संसदेत जंगी स्वागत

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाच्या वादात शिक्षणमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान सोमवारी पहिल्यांदाच संसद भवनात पोहोचले. या वेळी सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या (NDA) खासदारांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. संसद भवनाच्या आवारात धर्मेंद्र प्रधान यांच्या गाडीतून उतरताच "धर्मेंद्र प्रधान झिंदाबाद" अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.


गाडीतून उतरून प्रधान यांनी हसतमुखाने, हात जोडून सर्वांचे अभिवादन स्वीकारले. खासदार आणि समर्थकांच्या अलोट गर्दीत एका खासदाराने त्यांच्या डोक्यावर पारंपारिक टोपी आणि खांद्यावर शाल पांघरून त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी बोलताना एका सत्ताधारी खासदाराने म्हटले की, "कोणताही थेट आरोप झालेला नसताना किंवा गैरव्यवहारात नाव नसताना स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणारे प्रधान हे देशातील पहिलेच मंत्री असावेत." विरोधी पक्षांच्या वाढत्या दबावानंतर त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.



'एसी रुम'मधील नेता नाही; काँग्रेसच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर




संसद भवनात प्रवेश करताना काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी धर्मेंद्र प्रधान यांना पाहताच "असं घडत असतं!" असा उपरोधिक टोला लगावला. यावर जराही न डगमगता धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ पलटवार केला. "काहीही घडलेलं नाही! मी केवळ एसी रुममध्ये बसून राजकारण करणारा नेता नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे," अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवला.



राजीनाम्यामागे 'त्याग' आणि 'जबाबदारीचा' संदेश


राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (ट्विटर) आपली भूमिका स्पष्ट केली. "गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा विषय नाही. देशातील युवाशक्ती हीच भारताची खरी ताकद आहे. या तरुणांना कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाच्या किंवा अविश्वासाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हाच माझा निर्धार आहे," असे प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.



पुढे काय? संघटन की राज्याची धुरा?


शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्यावर आता पक्षाकडून कोणती नवी जबाबदारी दिली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर भाजपच्या निवडणूक प्रचाराची मोठी धुरा सोपवली जाऊ शकते किंवा पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते. समर्थकांच्या मते, राष्ट्रीय हितासाठी त्यांनी दिलेला हा त्याग त्यांची राजकीय प्रतिमा उंचावणारा ठरेल.



भाजपचे संकटमोचक आणि संघटक


धर्मेंद्र प्रधान यांची भाजपमधील गणना केवळ ओडिशातील बड्या नेत्यांमध्येच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील एका कुशल रणनीतिकार आणि संकटमोचक म्हणून केली जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि कर्नाटकातील निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.



भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भक्कम पाठिंबा




प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या सुधारणांचे कौतुक केले आहे. भाजपच्या मते, हा राजीनामा म्हणजे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला लागलेला धक्का नसून 'राजकीय उत्तरदायित्व', 'त्याग' आणि 'राष्ट्रहिताचा' एक उत्तम आदर्श आहे.





ओडिशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार ?


धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळात ओडिसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. २०१४ पासून ओडिशात भाजपचा जनाधार वाढवण्यात आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील भाजपच्या ७८ आमदारांपैकी बहुतांश आमदार आणि राज्य मंत्रिमंडळातील सुमारे ४० टक्के मंत्री हे प्रधान यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे शिक्षणमंत्रिपद सोडले तरी ओडिशाच्या राजकारणातील आणि पक्षातील त्यांचे वर्चस्व अबाधित राहील, असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि