नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बादल हे कुटुंबीयांसह गुरुद्वारा माता साहिब कौर येथे दर्शनासाठी गेले असताना एका निहंगाने त्यांच्यावर कृपाणाने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारात एका वादातून हा प्रकार घडला. हल्लेखोर निहंगाच्या वेशात होता. त्याने बादल यांच्यावर कृपाणाने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. या झटापटीत सुरक्षा दलातील एक पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Attack)
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास नांदेड पोलीस करत आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का किंवा एखाद्या वादातून अचानक घडला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Gurudwara)
माता साहिब कौर गुरुद्वारा नांदेड शहरातील मुख्य गुरुद्वारापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. बादल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. डिसेंबर 2024 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर सेवा बजावत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बादल यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. या प्रकरणातील हल्लेखोराची ओळख नारायण सिंह चौरा अशी झाली होती.
नांदेडमधील ताज्या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Nanded)






