CM Fellowship Program 2026 : सीएम फेलोशिपमधून प्रशासनाला नवा दृष्टिकोन मिळेल; फेलोंनी परिवर्तनाचे दूत बनावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि आरंभ कार्यक्रम



मुंबई : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल. फेलोंनी फेलोशिपच्या अनुभवातून आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तन घडविण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. (CM Fellowship Program 2026)


मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या ॲप्रिसिएशन आणि नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ.ज्योत्स्ना पडियार, वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, फेलोशिप कार्यक्रमाचे समन्वयक आणि सीएम फेलोज उपस्थित होते. (CM Fellowship Program 2026)


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनामध्ये अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच पद्धतीने काम करताना कल्पकता आणि ग्राउंडशी असलेला संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनात नवे विचार आणणे आणि त्याचवेळी तरुणांना शासनाची कार्यपद्धती समजून देणे, हा फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.


‘फेलोशिप’ हा एकतर्फी अनुभव नसून फेलोंकडून प्रशासनालाही नवे विचार आणि दृष्टिकोन मिळतात. नवीन पिढीच्या आकांक्षा आणि कार्यपद्धती समजून घेतल्याशिवाय सर्वसमावेशक प्रशासन शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने बदल स्वीकारत अधिक गतिमान होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.  (CM Devendra Fadnavis)



सीएम फेलोंनी स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड्स, जलयुक्त शिवाराचे जीआयएस मॅपिंग, ‘मागेल त्याला शेततळे’, ई-गव्हर्नन्स, तक्रार निवारण व्यवस्था, चॅटबॉट्स तसेच महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी यांसारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.


प्रशासनामध्ये बदलासाठी केवळ शासन निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लोकाभिमुख आणि सोपी कार्यपद्धती आधी स्वीकारून त्यानुसार शासन निर्णय करण्याची नवी कार्यसंस्कृती विकसित झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)


शासनाच्या १०० दिवसांच्या आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांतही फेलोंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आवास योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी, शेतकरी व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामातही फेलोंनी प्रभावी भूमिका बजावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘मी एकटा किती परिवर्तन करू शकणार?’ असा विचार न करता परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. फेलोशिपमधून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या आकांक्षा आणि गरजा समजून घेण्यासाठी करावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. (CM Devendra Fadnavis)


नवीन बॅचने मागील बॅचपेक्षा अधिक चांगले आणि नावीन्यपूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन फेलोंना शुभेच्छा दिल्या. (CM Devendra Fadnavis)



क्षेत्रीय अनुभवातून जनतेच्या आकांक्षा समजून घ्या - मुख्य सचिव राजेश अग्रवाल


शासनाच्या विविध योजना आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर जाऊन जनतेशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि प्रशासनात आवश्यक ते सुलभीकरण सुचविणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री फेलोंनी ‘फिल्ड’मध्ये अधिकाधिक काम करून अर्थपूर्ण अभिप्राय प्रशासनाला द्यावा, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी केले.


मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले की, विविध क्षेत्रांतील सल्लागार शासनाला मार्गदर्शन करतात; मात्र मुख्यमंत्री फेलोंचा अनुभव यापेक्षा वेगळा आहे. फेलोंनी गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ, क्षेत्रीय कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा सेविका आदींशी प्रत्यक्ष संवाद साधावा. क्षेत्रातील वास्तव समजून घेतल्यामुळे प्रशासनाला अधिक उपयुक्त आणि व्यवहार्य सूचना देता येतात. (CM Fellowship Program 2026)


ते म्हणाले की, प्रत्येक फेलोने आपली आवड, क्षमता आणि कौशल्य यानुसार विषय निवडून त्यात योगदान द्यावे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी फेलोंना उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)


प्रशासनातील तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच क्षेत्रीय वास्तव समजून घेण्यावर भर देताना मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले की, नवीन ॲप्लिकेशन्स आणि डिजिटल साधने तयार करणे महत्त्वाचे आहे; मात्र त्यापेक्षा क्षेत्रीय पातळीवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे अधिक गरजेचे आहे. क्षेत्रीय पातळीवर कोणते सुलभीकरण करता येईल, तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोणता अर्थपूर्ण अभिप्राय देता येईल, यावर फेलोंनी लक्ष केंद्रित करावे.


या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सन २०२६-२७ पासून सुरू होणाऱ्या ‘पोस्ट ग्रज्युऐट सर्टिफीकेट प्रोग्रॅम इन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड पब्लिक पॉलिसी’ या पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्यामार्फत प्राध्यापक बकुळ राव यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. (CM Fellowship Program 2026)


अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची माहिती दिली.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी