Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा
August 26, 2026 03:02 PM
काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे निसर्गाचा मोठा कहर पाहायला मिळाला. अचानक आलेल्या भीषण महापुराने (फ्लॅश फ्लड) संपूर्ण भागाला झोडपून काढले आहे. या हाहाकारात आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ९ जण बेपत्ता आहेत. पाण्याच्या प्रचंड वेगाने अनेक घरे, वाहने, पूल आणि हायड्रोपावर प्रोजेक्ट्स वाहून गेले आहेत. नेपाळमधील या भीषण परिस्थितीमुळे भारतातही चिंता वाढली असून, सीमेला लागून असलेल्या बिहार राज्यामध्ये प्रशासनाने तातडीने हाय अलर्ट जारी केला आहे.
हिमनदी फुटल्याचा संशय, गावात दाणादाण
बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तिबेटच्या बाजूने भोटे कोशी नदीत अचानक पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली, ज्यामुळे तिमुरे आणि स्याप्रू बेसी ही गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली. स्थानिक भागात मुसळधार पाऊस झाला नसतानाही हा पूर आल्याने, तिबेटमधील एखादे हिमनदीचे तलाव (Glacial Lake) फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर या पुराचे थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना आणि भलामोठा पूल वाहून जाताना दिसत आहे.
पुराचा सर्वाधिक फटका तिमुरे बाजार आणि सीमाशुल्क (Customs) क्षेत्राला बसला आहे. संपूर्ण बाजारपेठ, तेथे उभी असलेली वाहने आणि व्यापारी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. गेल्याच वर्षी बांधण्यात आलेला भारत-चीन जोडणारा 'फ्रेंडशिप ब्रिज' देखील पुन्हा एकदा पुराच्या शक्तिशाली प्रवाहात नष्ट झाला. नेपाळ पोलिसांच्या तीन चौक्यांचे अतोनात नुकसान झाले असून, सीमेवर तैनात असलेले 'आर्म्ड पोलीस फोर्स'चे ९ जवान बेपत्ता झाले आहेत.
या भीषण पुरामुळे नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे ४३० मेगावॅट विजेचे उत्पादन ठप्प झाले असून, हे प्रमाण देशाच्या एकूण जलविद्युत क्षमतेच्या १२ टक्क्यांहून अधिक आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी तातडीने आपत्कालीन बैठक घेऊन लष्कर आणि बचाव पथकांना मैदानात उतरवले आहे. मात्र, नद्यांमधील पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने आणि हवामान खराब असल्याने लष्कराची हेलिकॉप्टर बाधित भागात उतरू शकत नाहीत, ज्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत.
भारतातील बिहार सरकार सतर्क; सुरक्षेचे आदेश
नेपाळमधील भोटे कोशी नदीचा प्रवाह त्रिशूली नदीला मिळतो आणि पुढे हीच नदी 'गंडक' नावाने भारतात (बिहारमध्ये) प्रवेश करते. त्यामुळे बिहार सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सीमावर्ती जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन गंडक व कोसी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक पडल्यास सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तिबेटमध्येही मोठी जीवितहानी; शी जिनपिंग यांचे आदेश
नेपाळच्या पलीकडे चीनच्या तिबेट क्षेत्रातील गिरॉन्ग परगण्यातही मोठे भूस्खलन आणि पूर आला आहे. यामुळे रस्ते, वीज आणि संपर्क व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आणि पुढील धोके टाळण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उतरवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या नेपाळ, तिबेट आणि भारतातील बिहार राज्य या तिन्ही क्षेत्रांत पूरपरिस्थितीमुळे कमालीचा तणाव आणि सतर्कतेचे वातावरण आहे.