तुळजापूर: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा ११ ते २७ ऑक्टोबर दरम्यान अतिशय उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा होणार आहे. या १५ दिवसांच्या सोहळ्यात घटस्थापनेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
मंचकी निद्रेने होणार शारदीय उत्सवाची सुरुवात
मुख्य नवरात्रोत्सवापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी घटस्थापना आणि रात्री छबिना मिरवणूक निघेल, ज्यामुळे अधिकृत नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल.
नवरात्र महोत्सवाची मुख्य कार्यक्रम पत्रिका
१२ ते १४ ऑक्टोबर: देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.
१५ ऑक्टोबर (ललिता पंचमी): दुपारी रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना मिरवणूक.
१६ ऑक्टोबर: मुरली अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.
१७ ऑक्टोबर: शेषशाही अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.
१८ ऑक्टोबर: भवानी तलवार अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक.
१९ ऑक्टोबर (दुर्गाष्टमी): महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा, वैदिक होम-हवन आणि रात्री छबिना मिरवणूक.
२० ऑक्टोबर (विजयादशमी/दसरा): दुपारी १२ वाजता होमावरील धार्मिक विधी, घटोत्थापन आणि रात्री नगरहून येणाऱ्या पलंग, पालखीची मिरवणूक.
२१ ऑक्टोबर: पहाटे सीमोल्लंघन सोहळा आणि त्यानंतर देवीची मंचकी निद्रा.
कोजागिरी पौर्णिमा आणि सोलापूरच्या काठ्यांचा सोहळा
सीमोल्लंघन सोहळ्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सकाळी माता नगरच्या पलंगावर विसावणार आहे. सलग ५ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. याच दिवशी दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे शहरात आगमन होणार असून, रात्री सोलापूरच्या काठ्यांसह भव्य छबिना मिरवणूक काढली जाईल. तसेच २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
या उत्सवासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होतात. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.