अहिल्यानगरमध्ये दीपावलीच्या रात्री 21 ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळल्या दुर्घटना

दीपावलीच्या रात्री अहिल्यानगर शहरात फटाक्यांमुळे 21 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, परंतु अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणानिमित्त अहिल्यानगर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच, फटाके, विद्युत रोषणाई व अन्य कारणांमुळे शहरासह परिसरात एकाच रात्री वेगवेगळ्या 21 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून ते पहाटे दोन वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची मोठी धावपळ उडाली. मात्र, जवानांच्या तत्परतेमुळे सर्व आगींवर वेळत नियंत्रण मिळवण्यात यश आले असून संभाव्य जीवित आणि वित्तहानी टळली आहे.


दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. याच काळात शहरातील विविध भागांतून आगीच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाल्या. सिद्धार्थनगर मधील बालभवनजवळ, जुन्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बागडपट्टी येथील दुकान, भिंगारमधील सिटीझन कॉलनीतील नारळाचे झाड, तसेच लालटाकी परिसरातील पेट्रोल पंपाजवळील भंगार दुकानाला आग लागली. पत्रकार कॉलनी आणि माणिकनगर येथेही नारळाच्या झाडाला आग लागल्याच्या घटना घडल्या.


तसेच नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ब्रिजजवळील मोकळी जागा, गुलमोहर रोडवरील पारिजात चौक, डी-मार्ट समोरील पानटपरी, बालिकाश्रम रोडवरील न्यूक्लिअस हॉस्पिटलसमोर आणि प्रोफेसर चौकातील मकासरे हेल्थ क्लब परिसरात आगीच्या घटनांची नोंद झाली. माळीवाड्यातील भापकर हॉस्पिटल शेजारी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलसमोर आणि तारकपूर येथील झुलेलाल मंदिर परिसरातही आगीची वर्दी मिळाली.


या शिवाय जिल्हा परिषदेजवळ बसस्थानकासमोर, सिव्हिल हॉस्पिटलसमोरील सारडा कॅन्टीनच्या मागे, बागडपट्टी येथील सम्राट इलेक्ट्रिकसमोर, तपोवन रोडवरील सूर्यनगर परिसरातील मारुती मंदिरासमोर, शंकर महाराज मठाजवळ बोराटे यांच्या घराजवळ आणि गंज बाजारातील जामगांवकर ज्वेलर्सच्या टेरेसवरील टॉवरला आग लागली. रामवाडीतील एसटी वर्कशॉपजवळ, नेप्ती नाका चौकातील ठाणगे मळा, बाळाजीबुवा विहिरीजवळ लाकडाला आणि वारूळाचा मारुती रोडवरील गार्डन वेस्टलाही आग लागल्याच्या घटना घडल्या.


या सर्व घटनांची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही ठिकाणी गवत, कचरा आणि झाडांना आग लागली होती, तर काही ठिकाणी दुकाने, पानटपरी, भंगार साहित्य आणि इमारतीवरील टॉवरला आग लागल्याने जवानांना अधिक सतर्कता बाळगावी लागली. आगीचा फैलाव होऊ नये, यासाठी जवानांनी अथक प्रयत्न करून सर्व आगी आटोक्यात आणल्या.


दीपावलीच्या रात्री एकाच वेळी 21 ठिकाणी आग लागल्यामुळे मोठी धावपळ उडाली होती, परंतु जवानांच्या वेळेत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर, सणासुदीच्या काळात नागरिकांनी फटाके फोडताना आणि विद्युत रोषणाई करताना आवश्यक ती काळजी व खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 15 वाहनांना उडवले, सुदैवाने जीवित हानी नाही

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी

Maharashtra ST : एसटीच्या 13,980 पदांच्या कंत्राटी भरतीत फसवणूक झाल्यास कठोर कारवाई; खासगी संस्थांची चौकशी होणार

Mumbai News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ! ट्रकने खासगी बसला 200 मीटर फरफटत नेले अन्... 38 प्रवासी जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर शुक्रवारी (दि. 13

Maharashtra : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 2.96 लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; 1.88 कोटी रुपये परत

मुंबई : राज्यातील दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने

'एसआयआर'मध्ये नोटीस बजावलेले ९९.९४ टक्के मतदार पात्र

मुंबई : विशेष मतदारपडताळणी मोहिमेअंतर्गत (एसआयआर) नोटीस बजावण्यात आलेल्या राज्यातील १ कोटी २२ लाख २४ हजार ७

Maharashtra Weather : महाराष्ट्रात दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा; पुढील 4 ते 5 दिवस हवामान कसे राहणार?

Maharashtra Weather: महाराष्ट्रात सध्या बदलत्या हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा उष्ण आणि कोरडे वातावरण, तर पहाटे व