Saturday, August 29, 2026

Mumbai Accident : मुंबईत वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांनी गमावला जीव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Mumbai Accident : मुंबईत वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांनी गमावला जीव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई : चेंबूर आणि माटुंगा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत मोटरसायकलवर मागे बसून प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलिसांनी वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल केले असून अपघात नेमका कसा झाला, याचा तपास सुरू आहे.

चेंबूरमध्ये झालेल्या अपघातात 25 वर्षीय धनश्री डोंगरे यांचा मृत्यू झाला. धनश्री या खासगी कंपनीत काम करत होत्या. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता त्या त्यांचा भाऊ मानस याच्यासोबत मोटरसायकलवरून चेंबूर स्टेशनच्या दिशेने जात होत्या. दोघांनी नुकतेच खरेदी केलेले कपडे बदलण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. सुभाषनगर बस स्टॉपजवळील मुक्तानंद हायस्कूल परिसरात त्यांच्या मोटरसायकलला एका अवजड वाहनाने धडक दिली.

https://www.prahaar.in/2026/08/29/major-accident-in-chiplun-two-st-buses-collide-30-to-40-passengers-injured/

पोलिसांच्या माहितीनुसार, अवजड वाहनाने मोटरसायकलच्या हँडलला धडक दिल्यानंतर मानसचे नियंत्रण सुटले. तो पुढे पडला, तर धनश्री रस्त्यावर पडून वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून झेन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे भाऊबीजेच्या दिवशी डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, माटुंगा पोलिसांच्या हद्दीतही 46 वर्षीय मैना बीबी यांचा अपघातात मृत्यू झाला. त्या अँटॉप हिल परिसरात कुटुंबासोबत राहत होत्या आणि घरकाम करत होत्या. 28 ऑगस्ट रोजी रात्री कामासाठी रे रोडकडे जात असताना त्या मोटरसायकलवर मागे बसल्या होत्या. वडाळा पश्चिम येथील फोर रोड्स परिसरात मोटरसायकलची पाण्याच्या टँकरला धडक झाली. यावेळी मैना बीबी रस्त्यावर पडून टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या. सायन रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >