Tuesday, September 1, 2026

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात? मलाही तसंच वाटलं होतं... आमचा खेळ आता संपलाय, आपण आज जिवंत वाचणार नाही..." हे सुन्न करणारे शब्द आहेत नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील रहिवासी प्रकाश यांचे. त्रिशुली नदीला आलेल्या भयानक महापुरात डोळ्यांसमोर मोठ्या इमारती, गाड्या आणि माणसांचे संसार वाहून जात असताना, प्रकाश यांचे ४० वर्षे जुने 'हिरवे घर' (Green House) मात्र महापुराच्या अथांग लाटांसमोर पर्वतासारखे ठामपणे उभे राहिले. सोशल मीडियावर या घराचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले असून, हे घर सध्या 'मिराकल हाऊस' (चमत्कारी घर) म्हणून जगभरात चर्चेत आले आहे.

पूर येताच सुरू झाली जगण्याची धडपड

पुराच्या त्या भीषण क्षणाची आठवण सांगताना प्रकाश म्हणाले की, "जेव्हा त्रिशुली नदीला पूर आला, तेव्हा मी घराशेजारी असलेल्या माझ्या दुकानात होतो. नदीचे पाणी वेगाने शहरात शिरत असल्याचे समजताच मी जीवाच्या आकांताने घराकडे धाव घेतली. घरात माझी पत्नी, मुलगी आणि कौटुंबिक सदस्यांसह ५ जण अडकले होते. मी घरात जाऊन सर्वांना पटकन बाहेर पडण्यास सांगितले, पण आम्ही बाहेर येतो तोच पुराच्या पाण्याचा वेग इतका वाढला होता की, माझ्या डोळ्यांसमोर माझी चारचाकी गाडी उलटली. बाहेर पडणे आता पूर्णपणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर आम्ही पुन्हा घरात पळ काढला."

पाणी चौथ्या मजल्यापर्यंत घुसले; छतावर घेतला आसरा

पाण्याचा वेढा वाढत गेल्याने प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबाने सुरुवातीला चौथ्या मजल्याचा (टॉप फ्लोअर) आसरा घेतला. मात्र, पुराचे पाणी इतके वाढले की ते चौथ्या मजल्यापर्यंत शिरले. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने इमारतीच्या सर्वात वरच्या छतावर जाऊन आसरा घेतला. प्रकाश पुढे सांगतात, "खाली पुराचा हाहाकार सुरू होता आणि वर आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी देवाचा धावा करत होतो. त्यात माझी फक्त एकच चिंता वाढली होती... माझा लहान मुलगा शाळेत गेला होता आणि तो घरात नव्हता. आम्ही जर आज वाचलो नाही, तर त्या लहानाचे काय होईल? या विचाराने माझा जीव टांगणीला लागला होता."

४० वर्षे जुने घर महापुरात कसे टिकून राहिले ?

आजूबाजूच्या नवीन आणि मोठ्या इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या, पण हे घर कसे वाचले? याबद्दल बोलताना प्रकाश म्हणाले, "हे घर सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेले आहे. त्या काळात वापरले जाणारे सिमेंट आणि बांधकामाचे साहित्य अतिशय उत्तम दर्जाचे असायचे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, आमचे घर नदीकाठी असल्यामुळे आम्ही त्याचा पाया (Foundation) अत्यंत मजबूत करण्यासाठी खूप खर्च केला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून पायाखाली डांबरी रस्त्याचे २ ते ३ थर (Layers) दिले होते. याच भक्कम पायामुळे आणि जुन्या बांधकामामुळे आमचे घर पुराच्या प्रचंड प्रवाहातही टिकून राहिले."

पाइप आणि दोरीच्या साह्याने थरारक सुटका

तब्बल दीड तास हे कुटुंब मृत्यूच्या दाढेत अडकून पडले होते. पाण्याचा प्रवाह थोडा ओसरल्यानंतर शेजारच्या गल्लीतील (Toll Area) स्थानिक लोक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी दोन इमारतींच्या मध्ये एक मोठा पाइप ठेवला आणि दोरीच्या साह्याने प्रकाश यांच्या कुटुंबातील सदस्यांना एकापाठोपाठ एक सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने कुटुंबातील सर्व ६ सदस्य सुरक्षित वाचले आहेत.

दुकानाचे सामान अन् वाहने वाहून गेली, पण जगण्याची जिद्द कायम!

या महापुरात प्रकाश यांच्या घरातील तळमजला आणि गोदाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. दुकानातील लाखो रुपयांचे सामान, दोन गाड्या, बाईक आणि स्कुटर महापुरात वाहून गेल्या. सध्या हे कुटुंब काठमांडू येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे. सर्वकाही गमावले असले तरी प्रकाश यांनी आपली हिंमत हारलेली नाही. "जे काही होते ते मातीत गाडले गेले किंवा महापुरात वाहून गेले. पण आमचे प्राण वाचले हेच आमचे सुदैव! आम्ही खचणार नाही, पुन्हा नव्याने सर्वकाही उभारू आणि याच ठिकाणी पुन्हा उभे राहू," असा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >