Wednesday, September 2, 2026

Nashik : नाशिकमध्ये कांद्याचे भाव पुन्हा साडेचार हजारांवर, चाळीत आता केवळ ४० टक्के कांदा शिल्लक

Nashik : नाशिकमध्ये कांद्याचे भाव पुन्हा साडेचार हजारांवर, चाळीत आता केवळ ४० टक्के कांदा शिल्लक

Nashik : कांद्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली असून, नाशिकच्या बाजारात कांद्याचा सरासरी भाव साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातील कांदा देशातील प्रमुख महानगरांमध्ये उपलब्ध करून दिल्याने मागील आठवड्यात कांद्याच्या दरात सुमारे ५०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र, चालू आठवड्यात कांद्याचे दर पुन्हा पूर्वपातळीवर आले आहेत.या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना (Maharashtra State Onion Growers' Association) आक्रमक झाली असून, शेतकऱ्यांनी घाईघाईने कांदा विकण्याऐवजी बाजारातील मागणी, उपलब्ध साठा आणि नवीन कांद्याच्या आगमनाचा कालावधी लक्षात घेऊन नियोजन करावे. दर्जेदार कांदा पिकवा, टप्प्याटप्प्याने विक्री करा आणि यंदा आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून घ्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केले आहे.

बाजारात कांद्याचा तुटवडा राहण्याची शक्यता

नवीन खरीप कांदा बाजारात येण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत बाजारात कांद्याचा तुटवडा राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणत अधिकाधिक नफा मिळवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.जवळपास दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांद्याच्या दराने काही दिवसांपूर्वी चार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. किरकोळ बाजारातील कांद्याच्या दरात तब्बल ५९ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफमार्फत (NCCF) खरेदी करण्यात आलेल्या राखीव साठ्यातील काही कांदा दिल्ली आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये पाठवण्यात आला. हा कांदा ३५ रुपये किलो म्हणजेच ३५०० रुपये प्रतिक्विंटल दराने उपलब्ध करून देण्यात आला.

सरकारच्या या निर्णयाचा परिणाम घाऊक बाजारावरही झाला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे दर तब्बल ४०० ते ५०० रुपयांनी घसरले. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरकारकडे राखीव कांद्याचा साठा कमी आहे. त्यातच चाळीत साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्याने उपलब्ध साठ्यावरही मर्यादा येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांना पुढील तीन ते चार महिन्यांच्या बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार करून कांदा विक्रीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. जुना आणि नवीन कांदा या दोन्हीला यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

चाळीत आता केवळ ४० टक्के कांदा शिल्लक

नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी खरीप कांद्याच्या लागवडीला मोठा विलंब झाला आहे. जिल्ह्यात साधारण ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याची लागवड अपेक्षित असताना, आतापर्यंत केवळ ५०० हेक्टरवरच लागवड झाली आहे. म्हणजेच अपेक्षित क्षेत्राच्या अवघ्या दोन टक्के क्षेत्रावर खरीप कांद्याची लागवड झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून बाजारात दाखल होणारा नवीन खरीप कांदा यंदा मात्र नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात येण्यास जवळपास दीड महिन्याचा विलंब होणार आहे. दरम्यान, चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यापैकी तब्बल ६० ते ६५ टक्के कांदा आतापर्यंत बाजारात विकला गेला आहे. त्यामुळे आता चाळीत केवळ ३५ ते ४० टक्के कांदा शिल्लक असल्याचा अंदाज आहे. हा साठादेखील ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच पुरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >