Saturday, September 5, 2026

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी फोडली ‘हंडी’

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी फोडली ‘हंडी’

- २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी?; सचिन अहिर भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेली ‘हंडी’ शनिवारी चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने ही २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Aditya Thackeray)

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्व नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. ‘ड्रग फ्री इंडिया, ड्रग फ्री महाराष्ट्र’ या संकल्पनेवर हा उत्सव आयोजित करण्यात आल्याचे सांगत, दहीहंडी हा सण महाराष्ट्राची संस्कृती, श्रद्धा आणि सामूहिक एकतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. गोविंदांनी एकमेकांना साथ देत मानवी मनोरे रचण्याची परंपरा ही आपल्या सामूहिक शक्तीची साक्ष देत असल्याचे ते म्हणाले. (Aditya Thackeray)

मात्र, या सर्व घडामोडींमागे वरळी मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा रंगली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा अवघ्या ८ हजार ८०१ मतांनी विजय झाला होता. त्यावेळी शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढवली होती. आता वरळीतील राजकारणात वेगाने बदल होत असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर हे दहीहंडीच्या निमित्ताने भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीचा हा गड राखणे अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Aditya Thackeray)

अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाला प्रताप सरनाईकांकडून आधार

- दरम्यान, २००९ मधील दहीहंडी उत्सवात मानवी थरावरून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आणि तेव्हापासून अंथरुणाला खिळून असलेल्या गोविंदा नागेश भोईर याच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केली. - भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याचा अवघ्या २४व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून कोसळून अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गेली १८ वर्षे नागेश भोईर हा अंथरुणात आहे. काही दिवसांपूर्वी नागेशने आर्थिक मदत देण्यापेक्षा उपचारांचा खर्च शासनाने उचलण्याची मागणी केली होती. (Aditya Thackeray)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >