Friday, September 4, 2026

Gateway of India ferry boat : गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोट बंद; ३८ प्रवाशांची सुखरूप सुटका

Gateway of India ferry boat : गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोट बंद; ३८ प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना समुद्र सफरीसाठी घेऊन गेलेली ‘अन्वरी’ नावाची फेरीबोट समुद्रात अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. बोटीवर ३४ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स असे एकूण ३८ जण होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या तत्परतेने आणि जवळच असलेल्या ‘आझाद हिंद’ फेरीबोटीच्या मदतीने सर्व ३८ जणांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अन्वरी’ फेरीबोट गेटवे ऑफ इंडियावरून पर्यटकांना घेऊन समुद्रात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास बोट गेटवेच्या दिशेने परतत असताना किनाऱ्यापासून सुमारे १.५ नॉटिकल मैल अंतरावर तिच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे बोट समुद्रातच थांबली. रात्रीची वेळ आणि समुद्रातील अंधारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बिट क्रमांक १ चे पोलीस अंमलदार अभिजित शिंदे आणि पोलीस निरीक्षक गुरव यांनी परिसरातील उपलब्ध बोटींची माहिती घेतली. त्यावेळी ‘आझाद हिंद’ फेरीबोट घटनास्थळाजवळ असल्याचे समोर आले.

पोलिसांनी ‘आझाद हिंद’चे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या बोटीवरील क्रूला तातडीने ‘अन्वरी’च्या मदतीसाठी पाठवण्यात आले. ‘आझाद हिंद’ घटनास्थळी पोहोचल्यानंतर बंद पडलेल्या फेरीबोटीला सुरक्षितपणे टो करून गेटवे ऑफ इंडियाच्या जेट्टी क्रमांक २ येथे रात्री सुमारे ९ वाजून १० मिनिटांनी आणण्यात आले.

या घटनेत सर्व ३४ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांची तत्परता आणि सहकारी फेरीबोटीच्या मदतीमुळे संभाव्य मोठा धोका टळला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >