Saturday, September 5, 2026

Mumbai Water Crisis : पाण्याच्या तक्रारींमागील कारणे शोधा, तक्रारींचे निराकारण झाल्यानंतर स्थानिकांशी संवाद साधा

Mumbai Water Crisis : पाण्याच्या तक्रारींमागील कारणे शोधा, तक्रारींचे निराकारण झाल्यानंतर स्थानिकांशी संवाद साधा

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असून यापाणीपुरवठ्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन तक्रार मागील कारणे निश्चित करावीत. त्यानुसार तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे की नाही, याची खातरजमा करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागाची आढावा बैठक शुक्रवार ४ सप्‍टेंबर २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्‍यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले. उपायुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्‍तम माळवदे, उप जल अभियंता मंगेश शेवाळे उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी जल अभियंता विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुंबई महानगरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रभावीपणे निराकरण करावे. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, वितरणाच्या वेळेतील बदल, जलवाहिन्यांमधील गळती तसेच अन्य तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास केवळ तात्पुरती उपाययोजना न करता तक्रारीच्या मूळ कारणांचा शोध घ्‍यावा. त्‍यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे स्‍पष्‍ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

तोपर्यंत पाणी कपात मागे घेणे शक्य नाही

ऑगस्ट २०२६ मध्ये मुंबईत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यातदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्‍याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्‍ये ३० सप्‍टेंबर रोजी १०० टक्‍के पाणीसाठा असेल तरच पाण्‍याची परिस्थिती समाधानकारक आहे, असे म्‍हणता येते. मात्र, आज ४ सप्‍टेंबर २०२६ रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या विविध धरणांतील पाणीसाठा सुमारे ९५ टक्‍के इतका आहे. तोपर्यत मुंबई महानगरात लागू असलेली १० टक्‍के पाणीकपात मागे घेणे शक्‍य नाही,असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

एक दिवस तरी अधिक दाबाने पाणीपुरवठा

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू असून टोकावरील वस्त्या, उंचावरील भाग किंवा अन्य संवेदनशील क्षेत्रांना झळ पोहोचत आहे. पाणी कपातीमुळे काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित असले, तरी १० टक्क्यांपेक्षा अधिक तुटवडा जाणवत असल्यास, तेथील नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी जल अभियंता विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. पाणीपुरवठ्याचे परिक्षेत्र लक्षात घेता ठराविक दिवसांपैकी १ दिवस तरी पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्‍याचा प्रयत्‍न करावा जेणेकरून टोकाच्‍या भागात पुरेशा दाबाने पाणी पोहोचू शकेल. सद्यस्थितीत लागू असलेल्‍या पाणीकपातीबाबत लोकप्रतिनिधी, नागरिकांना अवगत करावे. त्‍याचेवळी वितरण व्‍यवस्‍थेतील त्रुटी शोधून त्‍या विनाविलंब दूर कराव्‍यात जेणेकरून पाणीकपातीची कमीतकमी झळ नागरिकांना पोहोचेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >