इयत्ता सहावीच्या मुलांसाठी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारीत पुस्तकांतील धडे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत आधार असून त्यामध्ये नमूद केलेली मूल्ये, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आता मुंबई महापालिका शाळांमधील इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधानिक मूल्ये, नागरी जबाबदारी, मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विचारांवर आधारित शैक्षणिक कार्यक्रम विकसित केला जाणार आहे. तसेच इयत्ता ६वीच्या मुलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तकांचे वाटप करून त्यातील धडे शिकवले जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये, संविधानिक मूल्ये, नागरी जबाबदारी या विचारांवर आधारित शैक्षणिक साहित्य विकसित करून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच जबाबदार, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व राष्ट्रहिताची जाणीव असलेले नागरिक घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे. ( Municipal Schools)
सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणार मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचा कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंड अर्थातकांजूर नागरी ...
यासाठी महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी दिशातरंग व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याकरता ८ कोटी ९० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. यामाध्यमातून महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविंधानिक मुल्ये, नागरी जबाबदारी, मुलभूत अधिकार व कर्तव्ये आदी विचारांवर आधारीत शैक्षणिक कार्यक्रम विकसित केला जाणार आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, लोकशाही तत्त्वे तसेच जबाबदार नागरिकत्व विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक उत्तरदायित्व, शिस्त, सहिष्णुता, समानता, बंधुता व राष्ट्रप्रेम यांसारख्या जीवनमूल्यांची जोपासना होणे तितकेच आवश्यक आहे. विशेषतः बालवयात विद्यार्थ्यांना कृतीआधारित, अनुभवाधारित व वयोगटानुसार शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ही मूल्ये समजावून सांगितल्यास ती त्यांच्या दैनंदिन आचार-विचारांमध्ये आणि वर्तनामध्ये अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होते. या अनुषंगाने हा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) तसेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच संविधानिक मूल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसारच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे छपाई करून घेत मुलांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. ( School Education)