Ahilyanagar : शेतातील कांदा आणल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. सख्ख्या भावाने आधी बहिणीला मारहाण केली आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा तिच्या घरात घुसून महिलांसह नातेवाईकांवर लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत तालुक्यातील राखसवाडी खुर्द येथे ही घटना घडली आहे. अलका भाऊसाहेब चोरमले यांनी याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामदास पिंगळे, रखमाजी विठ्ठल रुपनर, राहुल पिंगळे, आबा पिंगळे, बिरा बापू कोळपे आणि रुपाली रुपनर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
अलका चोरमले या पतीच्या निधनानंतर काही वर्षांपासून राखसवाडी खुर्द येथे आई-वडिलांकडे राहत आहेत. त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाऊ रखमाजी रुपनर हा शेजारीच कुटुंबासह राहतो. ४ सप्टेंबर रोजी सकाळी रखमाजी अलका यांच्या घरी आला. ‘माझ्या वावरातील कांदे का आणलेस?’ असा जाब विचारत त्याने शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच ‘तू इथे राहायचं नाही, निघून जा,’ असं म्हणत तो निघून गेल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती अलका यांनी आपल्या बहिणी आणि मुलाला फोनवरून दिली.
मुंबई : भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या आणि भविष्यात 'युनिकॉर्न' (Unicorn) बनण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप्सची नवी अधिकृत यादी जाहीर झाली आहे. 'ASK Private Wealth' ...
दोन दिवसांनी पुन्हा वाद
६ सप्टेंबर रोजी अलका यांना भेटण्यासाठी त्यांच्या बहिणी राधा आखाडे, आशा गोरे आणि मुलगा विकास चोरमले हे घरी आले होते. याचवेळी रामदास पिंगळे तिथे आला आणि शिवीगाळ करू लागला. जाब विचारल्याच्या रागातून त्याने राधा यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रखमाजी रुपनर याने आशा यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने पाठीत मारहाण केली. तर राहुल पिंगळे याने नंदिनी हिलाही लाकडी काठीने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
महिलांसह मुलालाही मारहाण
आबा पिंगळे आणि बिरा बापू कोळपे यांनी महिलांसह विकास चोरमले यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी अलका यांचे चुलते आणि चुलती मध्ये आले असता, रामदास पिंगळे याने त्यांच्या चुलत्याच्या डोक्यातही लाकडी काठीने मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मारहाणीचा प्रकार सुरू असतानाच रुपाली रुपनर हिने ‘इथून निघून जा, पुन्हा इथे आलात तर जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कांदा आणण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.






