Wednesday, September 9, 2026

Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत दुमदुमला “जय महाराष्ट्र”चा निनाद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित

Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत दुमदुमला “जय महाराष्ट्र”चा निनाद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित

लंडन : जगभरातील नेत्यांच्या उपस्थितीत ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज “जय महाराष्ट्र”चा निनाद घुमला. निमित्त होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या मानाच्या सन्मानाचे. उपमुख्यमंत्र्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा गजर झाला. विशेष म्हणजे, आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करत एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला आणि महाराष्ट्राच्या विकासाची यशोगाथा जगासमोर मांडली. आई आणि पत्नीच्या काबाडकष्टातून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची आपली विचारसरणी घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, ज्यावर संपूर्ण सभागृहात कडकडाट झाला.

प्रथितयश सोहळ्यातील उपस्थिती आणि गौरव

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस' यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमास उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, संसदेचे सदस्य, विविध देशांचे राजदूत, महापौर, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी त्यांना हा बहुमान देण्यात आला. विशेषतः, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबवलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम या प्रमुख योजनांसाठी त्यांना गौरविण्यात येत असल्याचे मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.(Commonwealth Public Leadership Award)

महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टाचा आणि वारशाचा गौरव

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन—या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची विकासयात्रा उभी असल्याचे सांगत, हा पुरस्कार राज्यातील जनतेच्या कष्टांचा, त्यांच्या आकांक्षांच्या वाटचालीचा गौरव असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी… जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…’ या ओळी उद्धृत करत त्यांनी आपल्या मातृभाषेची महती अधोरेखित केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

ब्रिटनच्या संसदेत भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर असल्याचे म्हटले. जगातील ३६ हून अधिक देशांनी मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, भारत-ब्रिटन संबंध नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत असून, ब्रिटनमध्ये राहणारे ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीय नागरिक हा भारत-ब्रिटन संबंधातील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचे त्यांनी सांगितले.(Commonwealth Public Leadership Award)

आई आणि पत्नीच्या कष्टांतून प्रेरणा

आपल्या भाषणात भावनिक होऊन एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझ्या आयुष्याची सुरुवात अगदी लहान अशा शेतकरी कुटुंबात झाली. मी कुठल्याही मोठ्या सुखवस्तू घराण्यात जन्माला आलो नाही. माझी आई आणि पत्नी यांना मी दिवसरात्र कुठलीही तक्रार न करता काबाडकष्ट करताना पाहिले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू मला जवळून माहीत आहेत.” या अनुभवातूनच आपण लोकसेवा शिकल्याचे ते म्हणाले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे करोडो बहिणी मिळाल्याचे सांगत, या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळून त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाचे आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

याचबरोबर, ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून राज्यातील गावागावांत सरकारी सेवा पोहोचवून ५ कोटींहून अधिक नागरिकांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारी मदत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मिळणारी मदत यांसारख्या सामाजिक उपक्रमांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल किंवा उंच इमारती नव्हेत, तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचवणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणे होय, अशी भूमिका त्यांनी मांडली.(Commonwealth Public Leadership Award)

महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि जागतिक सहकार्य

महाराष्ट्र हे भारताचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवरहाऊस असल्याचे सांगत, महाराष्ट्राचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १४ टक्के वाटा असून देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्र आकर्षित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, अटल कोस्टल ब्रिज आणि मुंबई कोस्टल रोड यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले.(Commonwealth Public Leadership Award)

ब्रिटीश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण देताना फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात मुंबई आणि लंडनमध्ये सहकार्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मी मुख्यमंत्री नाही, मी एक सामान्य माणूस आहे’, हा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील दृष्टिकोन आजही कायम असल्याचे सांगत त्यांनी शेवटपर्यंत सामान्य माणसासाठीच काम करण्याची आपली ठाम बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >