Wednesday, September 9, 2026

Pushmeet Kohli : NIT वारंगलच्या माजी विद्यार्थ्याची कमाल! Google सोबत उलगडणार मानवी DNA चे गूढ!

Pushmeet Kohli : NIT वारंगलच्या माजी विद्यार्थ्याची कमाल! Google सोबत उलगडणार मानवी DNA चे गूढ!

नवी दिल्ली : गूगल डीपमाइंडने (Google DeepMind) नुकताच यूट्यूबवर आपले संस्थापक डेमिस हसाबिस यांच्यावर आधारित एक डॉक्युमेंट्री व्हिडिओ प्रदर्शित केला. या व्हिडिओत जगभरातील नामांकित अभियंत्यांच्या गर्दीत एक भारतीय चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. ते म्हणजे पुष्मीत कोहली. (Pushpit Kohali) त्यांनी मानवी जनुक (DNA) मॅपिंग आणि त्याच्या सखोल अभ्यासात गूगलने मिळवलेल्या मोठ्या यशाची नुकतीच घोषणा केली आहे. सध्या 'गूगल डीपमाइंड'चे उपाध्यक्ष (VP) आणि 'गूगल क्लाउड'चे मुख्य शास्त्रज्ञ (Chief Scientist) म्हणून कार्यरत असलेल्या पुष्मीत कोहली यांनी 'एनआयटी वारंगल'मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. गूगलच्या नव्या 'अल्फाजिनोम ॲटलास' (AlphaGenome Atlas) या प्रकल्पाद्वारे मानवी डीएनएची इतकी सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे वैज्ञानिकांना मानवी अनुवंशिक कोडमधील (Genetic Code) प्रत्येक अक्षराचा अभ्यास करणे सोपे होणार आहे.

'अल्फाजिनोम ॲटलास' काय आहे ? (Pushmeet Kohli)

गूगलने विकसित केलेले हे एआय-आधारित (AI-powered) तंत्रज्ञान मानवी जनुकांमध्ये होणाऱ्या सुमारे ९ अब्ज संभाव्य बदलांचे काय परिणाम होतील, याचे अचूक भाकीत करण्यास मदत करेल. यामुळे संशोधकांना आनुवंशिक आजारांचे (Genetic Diseases) मूळ शोधणे आणि मानवी डीएनएची रचना समजून घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होणार आहे. डीपमाइंडच्या एका मोठ्या शास्त्रज्ञांच्या टीमने हे काम केले असून, पुष्मीत कोहली या प्रकल्पातील प्रमुख संशोधकांपैकी एक आहेत. सध्या कोहली हे डीपमाइंडच्या 'एआय फॉर सायन्स अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्ज' (AI for Science and Strategic Initiatives Unit) विभागाचे नेतृत्व करत आहेत. ही टीम एआयचा वापर करून जीवशास्त्र, साहित्यशास्त्र, गणित, सॉफ्टवेअर आणि फ्युजन क्षेत्रातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याचे काम करते.

एनआयटी वारंगल ते गूगल डीपमाइंड : प्रेरणादायी प्रवास

आयआयटीचा (IIT) टॅग नसतानाही पुष्मीत कोहली यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. भारतामधील प्रतिष्ठित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (NIT Warangal) येथून त्यांनी संगणकशास्त्र (Computer Science and Engineering) विषयात बी.टेक (B.Tech) ची पदवी घेतली. यानंतर त्यांनी युके (UK) गाठले. तेथे २००७ मध्ये ऑक्सफर्ड ब्रूक्स विद्यापीठातून कॉम्प्युटर व्हिजनमध्ये पीएच.डी. (PhD) पूर्ण केल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरेट संशोधक म्हणून काम केले. पुढे मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये तब्बल १० वर्षे सेवा दिल्यानंतर ते कॉग्निशन्स ग्रुपचे रिसर्च डायरेक्टर बनले. २०१७ मध्ये ते गूगलमध्ये रुजू झाले.

विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरी आणि 'टाइम'चा सन्मान

गूगल डीपमाइंडमध्ये काम करताना त्यांनी डेमिस हसाबिस यांच्यासोबत अल्फाफोल्ड (AlphaFold - ज्याला नोबेल पुरस्कार मिळाला), अल्फाइव्हॉल्व्ह, अल्फाटेन्सर आणि अल्फामिसन्स यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले आहे. मानवी डीएनएमधील अब्जावधी बदल समजून घेण्यासाठी 'अल्फाजिनोम ॲटलास' हे त्यांचे नवीनतम संशोधन आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२३ मध्ये 'टाइम' (TIME) मासिकाने एआय क्षेत्रातील जगभरातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.

मानवी आरोग्यासाठी 'अल्फाजिनोम ॲटलास'चे महत्त्व (Pushmeet Kohli)

मानवी जनुकांमध्ये (Genome) सुमारे ३ अब्ज डीएनए बेस पेअर्स असतात, परंतु या कोडमधील बहुतांश भागांचे कार्य अजूनही विज्ञानाला पूर्णपणे समजलेले नाही. गूगलच्या अल्फाजिनोम एआय मॉडेलने या ९ अब्ज संभाव्य बदलांचा काय परिणाम होतो याचा डेटा गोळा केला आहे. हा सर्व डेटा एकत्रित करून सुमारे १ पेटॅबाइट (1 Petabyte) क्षमतेचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे, जो अल्फाफोल्ड डेटाबेसपेक्षा ३० पटीने मोठा आहे. वैज्ञानिक आता या डेटाचा वापर करून आजारांशी संबंधित जनुकीय बदल शोधू शकतील आणि लॅबमध्ये पुढील संशोधनासाठी योग्य दिशा ठरवू शकतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >