Wednesday, September 9, 2026

BRICS 2026 : भारत आणि चीन संबंध : तणाव कमी होतोय, पण...ब्रिक्स परिषदेत मोदी-शी जिनपिंग भेटीकडे जगाचे लक्ष!

BRICS 2026 : भारत आणि चीन संबंध : तणाव कमी होतोय, पण...ब्रिक्स परिषदेत मोदी-शी जिनपिंग भेटीकडे जगाचे लक्ष!

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) या आशियातील दोन मोठ्या देशांमधील बिघडलेले संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरु आठवड्यात भारतात होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS 2026) परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) भारत दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या संभाव्य भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२० मधील गल्वान खोऱ्यातील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले होते.

सीमेवर सैन्य आमनेसामने नाही, पण मुख्य युद्ध साहित्य अजूनही तैनात

ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती दर्शवली होती. त्यानुसार दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने असलेल्या ठिकाणांवरून मागे हटले आहे (Disengagement) आणि सीमेवर गस्त घालणे पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र, सैन्य आणि भारी युद्ध साहित्य पूर्णपणे मागे घेण्याची प्रक्रिया (De-escalation and De-induction) अजूनही अपूर्ण आहे. सीमेवर अद्याप ड्रोन्स, रणगाडे, चिलखती गाड्या आणि रॉकेट लाँचर्स तैनात आहेत. तसेच लडाखसारख्या अत्यंत उंचावरील आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या भागातून सैनिकांना सुरक्षितपणे मागे बोलावणे ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

संवादाचे दरवाजे उघडे, पण...

दोन्ही देशांनी लष्करी कमांडर्स आणि मुत्सद्दी अधिकाऱ्यांमार्फत चर्चेची मालिका सुरू ठेवली आहे. यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) सध्या शांतता असली, तरी ती पूर्णपणे सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही. सीमेवर कायमस्वरूपी शांततेसाठी आवश्यक असलेली थोडं नियमावली (Confidence Building Measures) अद्याप बनलेली नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा एखादी चकमक होणारच नाही, याची कोणतीही हमी देता येत नाही. पूर्वी भारत आणि चीनदरम्यान जवळपास ३० मुद्द्यांवर चर्चांचे मंच कार्यरत होते, परंतु सध्या त्यातील बहुतांश बंद असून केवळ ४ ते ५ पातळ्यांवरच संवाद मर्यादित राहिला आहे.

व्यापारी संबंध मजबूत, पण भारताचा घाटा वाढला

सुरक्षेचा प्रश्न कायम असला तरी दोन्ही देशांमधील व्यापार मात्र मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. २०२५ मध्ये भारत-चीन व्यापार सुमारे $१५५ अब्ज डॉलर्स वर पोहोचला आहे. परंतु, या व्यापारात भारताची 'व्यापार तूट' (Trade Deficit) अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या वर्षी ही तूट सुमारे $९९ अब्ज डॉलर्स होती. याचा अर्थ भारत चीनकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू आयात करतो, परंतु चीनमध्ये भारतीय वस्तूंची निर्यात फार कमी होते. भारत आर्थिकदृष्ट्या वेगाने वाढत असल्याने चीनने भारतीय उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करायला हवी आणि भारतात गुंतवणूक वाढवायला हवी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ब्रिक्स परिषदेतील संभाव्य भेटीचे महत्त्व

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात संक्षिप्त द्विपक्षीय भेट होऊ शकते. पुढील वर्षी चीन ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भूषवणार असल्याने, ही परिषद यशस्वी व्हावी यासाठी चीनही प्रयत्नशील असेल. जरी अशा बहुपक्षीय परिषदांमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी फार कमी वेळ मिळतो, तरीही सीमेसारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी या भेटीचा उपयोग केला जाऊ शकतो. गल्वान घटनेनंतर दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध निवळण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरू शकते

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >