Minister Girish Mahajan : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. केवळ वृक्षारोपण न करता लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने हरित दूत बनून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भोंसला महाविद्यालयात ‘कुंभ युवा संवाद’
उन्नत नाशिक अभियान आणि मिशन ग्रीन मान्सूनअंतर्गत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला महाविद्यालयात ‘कुंभ युवा संवाद’ व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, अभिनेते चिन्मय उदगीरकर, सोसायटीचे विभागीय अध्यक्ष संजय पगारे, शीतल देशपांडे, नरेंद्र वाणी, मिथिला देशपांडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करून नशामुक्त भारत अभियान आणि वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.
Nashik : नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वातावरण बदलांमुळे नाशिक शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू (Dengue) आणि मलेरियाच्या (Malaria) ...
पर्यावरण संवर्धनात नागरिकांचा सहभाग आवश्यक
यावेळी, पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्गसमृद्ध ओळख कायम ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धनात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम, अभ्यास, देशसेवा आणि समाजसेवेत योगदान द्यावे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी संवर्धन, परिसर स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घ्यावा.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी युवकांनी पर्यावरण संरक्षणासोबतच अमली पदार्थविरोधी अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन केले. आयुक्त शेखर सिंह यांनी उन्नत नाशिक अभियानातून वृक्षारोपण, स्वच्छता आणि कुंभमेळा नियोजनात युवकांचा सहभाग वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.