Thursday, September 10, 2026

Supreme Court Abu Salem: अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळला

Supreme Court Abu Salem: अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळला

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन (Pradeep Jain) यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला (Abu Salem) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. 25 वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर आपली सुटका करावी, अशी मागणी करणारी सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

अबू सालेमला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले होते. त्यावेळी भारत सरकारने त्याला 25 वर्षांपेक्षा जास्त काळ कारावासात ठेवले जाणार नाही, असे पोर्तुगाल सरकारला आश्वासन दिल्याचा दावा सालेमने केला होता. त्यानुसार आपली 25 वर्षांची शिक्षा 31 मार्च 2025 रोजी पूर्ण झाली असल्याचे त्याचे म्हणणे होते. यामध्ये खटला सुरू असतानाचा कालावधी, शिक्षेनंतरचा तुरुंगवास आणि चांगल्या वर्तणुकीमुळे मिळालेली सूट यांचा समावेश करावा, अशी मागणी त्याने केली होती. (1993 Mumbai Bomb Blast)

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सालेमचा हा दावा मान्य केलेला नाही. पोर्तुगालमध्ये पासपोर्टशी संबंधित फसवणूक प्रकरणात त्याने भोगलेल्या शिक्षेचा कालावधी भारतातील 25 वर्षांच्या कारावासाच्या गणनेत धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग सध्या बंद झाला आहे. (Mumbai Serial Blast 1993)

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही सालेमने सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 2022 मधील निर्णयाचा आधार घेण्यात आला होता. या निर्णयात भारत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सालेमच्या शिक्षेबाबत केंद्राने योग्य वेळी प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले होते. (Pradeep Jain murder case)

प्रदीप जैन हत्या प्रकरणात जन्मठेपाची शिक्षा

अबू सालेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणासह प्रदीप जैन हत्या प्रकरणात त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. त्याच्या सुटकेसंदर्भातील मागणीवर केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका तसेच कायदेशीर बाबी यापूर्वी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे सालेमच्या सुटकेच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा