Saturday, October 31, 2026

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाच्या BMW कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. संगीत भारती चौक सिग्नलजवळ झालेल्या या अपघातानंतर कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांशी महिला चालकाने वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जुहू पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने त्यांच्यावरही गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जुहू येथील संगीत भारती चौक सिग्नलजवळ घडली. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका महिला चालकाने चालवलेल्या बीएमडब्ल्यू (BMW) कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारला धडक दिली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात या कारने एका महिलेच्या स्कूटीला आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, पळ काढताना या वाहनाने पुढे असलेल्या दुसऱ्या एका कारलाही धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला चालकाने पोलिसांचे ऐकण्याऐवजी कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी महिला चालकाला पोलीस पथक येईपर्यंत वाट पाहण्यास सांगताना दिसत आहेत. यावर "किती वेळ वाट पाहायची?" असा सवाल करत महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच जेव्हा एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिला रोखण्याचा आणि घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिला चालकानेही स्वतःचा मोबाईल काढून पोलिसांचे चित्रीकरण सुरू केले. "हे लोक मला कसे त्रास देत आहेत बघा, त्यांनी माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आहे आणि मला चारी बाजूंनी घेरले आहे," असा दावा करत तिने तिथे गोंधळ घातला.

या गोंधळामुळे आणि अपघातामुळे संगीत भारती चौक परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून तिला गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास लावले, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकली. या संपूर्ण प्रकाराचे प्रत्यक्षदर्शी आणि पादचाऱ्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अपघातग्रस्त कार मालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे जुहू पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे गाडी चालवणे आणि अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >