Pratap Sarnaik : नशेत वाहन चालवलं तर कारवाई! राज्यात ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास’ अभियान

मुंबई : रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्यात ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित व्यापक मद्य व अंमली पदार्थ तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत विविध प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्रालयात झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी या अभियानाचा आढावा घेतला. नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्याबरोबरच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार आणि पुनर्वसन यांचा समन्वय साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नशामुक्त एसटी’ अभियानांतर्गत चालक व वाहकांच्या ड्रग सेवन तपासणीसाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून स्वतः १ लाख रुपयांची देणगी देणार असल्याचेही सरनाईक यांनी जाहीर केले. या निधीतून तपासणी मशीन खरेदी करण्यात येणार आहे. (Pratap Sarnaik)



एसटीपासून खासगी वाहतुकीपर्यंत तपासणी


या अभियानात एसटी महामंडळ, महानगरपालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम आणि शासनासाठी कार्यरत कंत्राटी वाहनांचा समावेश असेल. त्याचबरोबर खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था लागू करण्याचे नियोजन आहे. (Pratap Sarnaik)


एमआयडीसी, कारखाने, कंपन्या आणि औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचारी वाहतूक सेवांसोबतच ट्रक, टँकर, धोकादायक मालवाहतूक, गोदामे, वितरण केंद्रे आणि बंदरांशी संबंधित वाहतुकीचाही यात समावेश केला जाणार आहे. शाळा-महाविद्यालयीन वाहने, रुग्णालयांची वाहने आणि रुग्णवाहिकांसाठी त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार स्वतंत्र नियम तयार केले जाणार आहेत.



कर्तव्यपूर्व आणि आकस्मिक तपासणी


वाहतुकीच्या स्वरूपानुसार कर्तव्यपूर्व मद्य तपासणी, नियोजित तसेच आकस्मिक अंमली पदार्थ तपासणी आणि संशयास्पद परिस्थितीत तपासणी केली जाणार आहे. तपासणीची पद्धत, वारंवारिता, जबाबदारी आणि त्यानंतरची कार्यवाही यासाठी एकसमान नियमावली तयार केली जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळ, प्रमाणित उपकरणे आणि डिजिटल नोंदव्यवस्थेवरही भर दिला जाणार आहे. (Pratap Sarnaik)



ड्रग तपासणीसाठी विशेष किट


अंमली पदार्थांची प्राथमिक तपासणी तात्काळ करता यावी, यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष तपासणी किटच्या चाचण्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. या किटचा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. गांजा आणि इतर संशयित पदार्थांची प्राथमिक छाननी याच्या माध्यमातून करता येणार असून, पदार्थाचे पॅकेट न उघडताही तपासणी शक्य असल्याने थेट संपर्काचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.


प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकतेनुसार विहित पद्धतीने पुष्टीकरण आणि पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. (Pratap Sarnaik)



उपचार आणि पुनर्वसनालाही प्राधान्य


नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्या चालकांवर शासनाची भूमिका कठोर राहणार असली, तरी व्यसनमुक्तीसाठी मदतीची गरज असलेल्या चालकांना समुपदेशन, उपचार, पुनर्वसन आणि वैद्यकीय मूल्यमापन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तपासणीदरम्यान सुरक्षिततेचा धोका आढळल्यास संबंधित चालकाला तात्पुरते वाहन चालविण्याच्या कर्तव्यापासून दूर करून पर्यायी चालकाची व्यवस्था केली जाईल. तपासणी व पुढील कारवाईदरम्यान न्याय्य पुनरावलोकन प्रक्रिया आणि चालकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचे संरक्षण सुनिश्चित केले जाणार आहे. (Pratap Sarnaik)



वाहनमालकांवरही जबाबदारी


नशामुक्त आणि सुरक्षित चालक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केवळ चालकाची नसून वाहनमालक, वाहतूक कंपन्या, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि कंत्राटदारांचीही असेल. त्यांच्या जबाबदाऱ्या नियम, सेवा करार आणि कार्यपद्धतींमध्ये स्पष्ट करण्यात येणार आहेत.


परिवहन, गृह, उद्योग, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय आणि शिक्षण विभागांच्या समन्वयातून राज्यस्तरीय नियोजन, जिल्हास्तरीय अंमलबजावणी आणि संस्थास्तरीय उत्तरदायित्वाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.



डिजिटल देखरेखीसह एकात्मिक प्रणाली


२०२६ ते २०२९ या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. डिजिटल व्यवस्थेद्वारे तपासण्यांचे प्रमाण, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, उपकरणांची कार्यक्षमता, वैद्यकीय संदर्भ आणि संबंधित संस्थांचे अनुपालन यांचा नियमित आढावा घेतला जाईल.


अंमली पदार्थांचा वापर रोखणे, तपासणी, पुढील कार्यवाही, उपचार, पुनर्वसन आणि प्रकरणांचा मागोवा घेण्यासाठी एकात्मिक प्रणाली विकसित केली जाणार आहे. ही प्रणाली केंद्रीय स्तरावरील संबंधित यंत्रणांशी जोडण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.


“प्रत्येक चालकाची जबाबदारी, प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास जपणे ही शासनाची सामूहिक जबाबदारी आहे. नशामुक्त चालक हा सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. (Pratap Sarnaik)


Comments
Add Comment

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात अमृत पर्वणीला खासगी वाहनांना ‘नो एंट्री’! नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये १५०० हेक्टरवर वाहनतळांचे नियोजन

Simhastha Kumbh Mela : पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत पर्वणीच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरात

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

मुंबई : शिवडीतील ‘कोलगेट जेटी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्हीच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा

Indian cricket team : टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल; फिजिओ......नोटीस पीरियडवर

नवी दिल्ली: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत असतानाच,

Nashik : कुंभमेळ्याची कामे १५ दिवस बंद राहणार, नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय; कारण काय ?

Nashik : २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. शहरातील २८

Switzerland Bus Accident : स्वित्झर्लंडमध्ये भीषण अपघात: डच पर्यटकांची बस दरीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य आल्प्स पर्वतीय भागात पर्यटकांच्या एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. सुरक्षा

Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा