Simhastha Kumbh Mela : पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत पर्वणीच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांच्या खासगी वाहनांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. देशभरातून येणाऱ्या भाविकांची वाहने शहराबाहेर उभारण्यात येणाऱ्या नियोजित वाहनतळांवर थांबवली जाणार आहेत. त्यानंतर भाविकांना विशेष बससेवेद्वारे अमृत स्नानाच्या ठिकाणी नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) मोठ्या प्रमाणावर तात्पुरते वाहनतळ उभारण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मिळून तब्बल १,५५९ हेक्टर क्षेत्रावर ७२ वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये ४६, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २६ वाहनतळ
प्रस्तावित नियोजनानुसार नाशिकमध्ये सुमारे ८८८ हेक्टर क्षेत्रावर ४६ वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ६७१ हेक्टर क्षेत्रावर २६ वाहनतळ प्रस्तावित आहेत. या सर्व वाहनतळांची एकत्रित क्षमता सुमारे तीन लाख मोटारी इतकी ठेवण्याचे नियोजन आहे. कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनांनी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात येत आहे. तात्पुरते वाहनतळ उभारण्यासाठी खासगी जागा उपलब्ध करून देण्यास इच्छुक जमीनमालक आणि पात्र संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक अटींबाबतची माहिती संबंधित यंत्रणेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही माहिती विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाणार आहे.
Nashik : २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. शहरातील २८ प्रमुख रस्त्यांचाही यात समावेश आहे. ...
या मार्गांलगतच्या जागांना प्राधान्य
कुंभमेळ्यात वाहनांची मोठी गर्दी होणार असल्याने प्रमुख प्रवेशमार्ग आणि वाहतूक मार्गिकांलगतच्या खासगी जागांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. यामध्ये गंगापूर रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, धुळे रोड, छत्रपती संभाजीनगर रोड, पुणे रोड, कश्यपी धरण रोड, मुंबई रोड आणि जव्हार रोड या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. याशिवाय वाहतूक नियोजनाच्या गरजेनुसार इतर ठिकाणांचाही विचार केला जाऊ शकतो. मात्र, ही ठिकाणे सध्या प्राथमिक स्वरूपाची असून अंतिम वाहनतळांची ठिकाणे वाहतूक व्यवस्थेच्या गरजेनुसार बदलू शकतात.
जागा निवडताना 'या' बाबी तपासणार
तात्पुरत्या वाहनतळासाठी जागा निवडताना प्रमुख मार्गांशी असलेली जोडणी महत्त्वाची ठरणार आहे. जागेला योग्य रस्ते जोडणी असण्यासोबतच जमीनमालकी किंवा कायदेशीर ताबा स्पष्ट असणे आवश्यक राहणार आहे. याशिवाय जागेचे क्षेत्रफळ, प्रमुख वाहतूक मार्गांशी संपर्क, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेची गरज आणि प्रत्यक्ष वापराची व्यवहार्यता या बाबींचाही विचार केला जाणार आहे. निवड झालेल्या खासगी जागांवर तात्पुरते वाहनतळ विकसित करणे, त्यांचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित जमीनमालक किंवा पात्र संस्थेची राहणार आहे. अमृत पर्वणीच्या दिवशी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासोबतच लाखो भाविकांच्या वाहनांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी ही यंत्रणा उभारली जाणार आहे.