Saturday, September 12, 2026

Nashik : आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा मृत्यू , २० वर्षीय जवानाने बॅरेकमध्ये घेतला टोकाचा निर्णय

Nashik : आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा मृत्यू , २० वर्षीय जवानाने बॅरेकमध्ये घेतला टोकाचा निर्णय

Nashik : भारतीय सैन्यदलात नुकताच दाखल झालेल्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center at Nashik Road) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विन एम. असे मृत अग्निवीराचे नाव असून, तो मूळचा केरळचा रहिवासी होता. त्याने सहा महिन्यांच्या प्रशिक्षणापैकी दहा आठवडे प्रशिक्षण पूर्ण केले होते. (Nashik News)

बॅरेकमध्ये आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजून ४० मिनिटांनी आर्टिलरी सेंटरमधील अशोक चक्र गेटजवळील आर्मी बॅरेकमध्ये अश्विन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब लक्षात येताच लष्करी सहकाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरवलं आणि उपचारांसाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात अश्विनजवळ कोणतीही मृत्यूपूर्वीची चिठ्ठी किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी सागर पुंजाराम मुतकुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik News)

मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट

अश्विन हा देशसेवेचं स्वप्न घेऊन अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाला होता. प्रशिक्षणाच्या काळातच त्याचा मृत्यू झाल्याने सहकारी आणि प्रशिक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती केरळमधील त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, ते नाशिककडे रवाना झाले आहेत. अश्विनच्या मृत्यूमागे मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल, पोलिस तपास आणि लष्करी पातळीवरील चौकशीनंतरच या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. सध्या मृत्यूमागील ठोस कारण समोर आलेलं नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >