BRICS Summit 2026 : भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ व्या BRICS शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकींमध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या घडामोडींमुळे भारताचं कूटनीतिक आणि आर्थिक महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.
इथिओपियाकडून भारतीय खाण कंपन्यांना निमंत्रण
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांना आपल्या देशातील खनिज संपत्तीमध्ये गुंतवणूक आणि उत्खननासाठी निमंत्रण दिलं आहे. इथिओपियामध्ये सोने, दुर्मिळ खनिजे आणि औद्योगिक खनिजांचे मोठे साठे असल्याचं सांगितलं जातं. भारतीय उद्योगांनी इथिओपियात यापूर्वीच सुमारे ५ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे ७५ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रासोबतच भारत आणि इथिओपिया यांच्यात संरक्षण खरेदी, लष्करी प्रशिक्षण आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. यामुळे आफ्रिकन खंडातील भारताची आर्थिक आणि सामरिक भागीदारी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले आहेत. तब्बल सात वर्षांनंतर जिनपिंग ...
मलेशियासोबत सेमीकंडक्टर भागीदारीवर भर
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबतच्या बैठकीत सेमीकंडक्टर, हाय-टेक उत्पादन आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.याशिवाय व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, फिनटेक, पर्यटन, शिक्षण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्याचा आढावा घेण्यात आला. जागतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि सेमीकंडक्टरची मागणी वाढत असताना, भारत आणि मलेशियामधील सहकार्य या क्षेत्रासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. मलेशियाच्या सबाह राज्यातील कोटा किनाबालू येथे भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्यास मलेशियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक संबंधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्लोबल साऊथचा आवाज मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न
नवी दिल्लीत होत असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत जगाचे लक्ष लागून राहिले आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचा विकास डोळ्यासमोर ठेवून भारत ग्लोबल साऊथचा (विकसनशील देशांचा) मजबूत आवाज म्हणून पुढे येत आहे. भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासोबतच आता इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, युएई आणि इजिप्त या नव्या सदस्यांच्या सहभागामुळे ब्रिक्स संघटनेची ताकद प्रचंड वाढली आहे. नवी दिल्लीतील या परिषदेमुळे भारतीय कंपन्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. खाणकाम, सेमीकंडक्टर, संरक्षण उत्पादन आणि फिनटेक या क्षेत्रांत भारतीय तंत्रज्ञानाची मागणी वाढल्याचे या द्विपक्षीय बैठकांमधून सिद्ध झाले आहे.