यंदा पक्षाच्या पारंपरिक ‘सेवा पंधरवडा’ऐवजी महिनाभराचे ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. ‘जनसेवा हीच प्रभुसेवा’ ही या अभियानाची मार्गदर्शक संकल्पना असून, विविध समाजघटकांपर्यंत पोहोचणारे सेवाभावी आणि नागरिककेंद्रित उपक्रम राबविले जाणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेमार्फत १२ प्रमुख उपक्रम हाती घेण्यात येणार असून, लोकसेवेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यासोबतच ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे साटम यांनी सांगितले.
Nashik E-bus : नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या ...
१७ सप्टेंबर रोजी अभियानाची सुरुवात ‘सेवा दिवस’ म्हणून करण्यात येणार आहे. या दिवशी गेटवे ऑफ इंडिया, बाणगंगा, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, जुहू चौपाटी, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पवई तलाव यांसह मुंबईतील १० प्रमुख ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. सायंकाळी ‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमांतर्गत मुंबईतील १० हजार बूथवर दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
मुंबईभर आरोग्य तपासणी मोहीम
‘सेवेचे रंग, राष्ट्राच्या संग’ या उपक्रमांतर्गत मुंबईतील १० विशिष्ट ठिकाणी विशेष रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच ‘सेवा की रंग, राष्ट्र के संग’ या उपक्रमातून प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मानवी समूहाच्या माध्यमातून रांगोळी साकारण्यात येणार असल्याचेही साटम यांनी सांगितले. २२ सप्टेंबर रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मधुमेह आणि रक्तदाब तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विक्रमी प्रमाणात आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईकरांमध्ये मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मधुमेहमुक्त मुंबई’ या उपक्रमाची घोषणा यावेळी करण्यात येणार आहे.
‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून युवक, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना त्यांच्या कल्पना, संकल्पना आणि उत्पादनांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सरकारकडून सीड फंडिंग दिले जाणार असून, आशादायी नवकल्पनांना कल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी मदत केली जाणार आहे. अभियानाचा भर समारंभापुरता मर्यादित नसून आरोग्य, सेवा, महिला व बालकल्याण, नवोन्मेष आणि नागरिकांचा सहभाग यावरही राहणार असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले आहेत. तब्बल सात वर्षांनंतर जिनपिंग ...
१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान ‘मेरे सपनों का भारत – चित्र सेवा’ या उपक्रमांतर्गत सरकारी तसेच खासगी शाळांमध्ये चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ‘नमो सेवा – अनकही कहानियां’ या उपक्रमाद्वारे पथनाट्यांच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि त्याचा लाभार्थ्यांवर झालेला परिणाम जनतेपर्यंत पोहोचविला जाणार आहे. ‘अंगण मिलन सेवा’ उपक्रमांतर्गत अंगणवाडी आणि आशा सेविकांचा सन्मान करण्यात येणार असून, पोषण, आरोग्यसेवा आणि महिला कल्याणाशी संबंधित कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ‘सेवा की कहाणी’ या उपक्रमातून लाभार्थ्यांना त्यांचे अनुभव व्हिडिओ, रील्स आणि छायाचित्रांच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
‘सेवा ज्योती कलश यात्रा’अंतर्गत पायी मोर्चे आणि दुचाकी रॅली काढण्यात येणार असून, त्यात प्रतीकात्मक ‘सेवा ज्योत’ घेऊन प्रवास केला जाणार आहे. या यात्रेची सांगता जाहीर सभांद्वारे करण्यात येणार आहे. ‘सेवा सेतू अभियान’अंतर्गत विविध शिबिरे आयोजित करून नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिनाभर चालणाऱ्या या ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता १७ ऑक्टोबर रोजी ‘सुशासन संवाद’ या कार्यक्रमाने होणार आहे. या माध्यमातून सुशासन आणि चांगल्या प्रशासनाबाबत संवाद साधला जाणार असल्याचे मुंबई भाजपकडून सांगण्यात आले.