Saturday, September 12, 2026

Indian Weightlifter : आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का! राष्ट्रकुल रौप्यविजेता खेळाडू स्पर्धेबाहेर

Indian Weightlifter : आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का! राष्ट्रकुल रौप्यविजेता खेळाडू स्पर्धेबाहेर

नवी दिल्ली: आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय वेटलिफ्टिंग संघाला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेला एकमेव पुरुष वेटलिफ्टर ऋषिकांत सिंग गुडघ्याच्या दुखापतीमुळे या महत्त्वपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.(Indian Weightlifter)

नेमकी काय आहे परिस्थिती?

मणीपूरचा रहिवासी असलेला आणि ६० किलो वजनी गटात स्पर्धा करणारा ऋषिकांत जुलैमध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुमारे आठवडाभर आधी गुडघ्यामुळे दुखापतग्रस्त झाला होता. ताण असूनही त्याने स्पर्धेत साहस दाखवत रौप्य पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनला आशा होती, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जवळपास एक महिना पुनर्वसन (रिहॅब) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Indian Weightlifter)

आता संघात फक्त महिला खेळाडूंचा समावेश:

ऋषिकांत सिंग बाहेर पडल्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय वेटलिफ्टिंग संघातून पुरुष खेळाडूंचे प्रतिनिधित्व संपले असून, आता संघात केवळ चार महिला खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये खालील खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील:

  • मीराबाई चानू (टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती) – ४९ किलो वजनी गट

  • ज्ञानेश्वरी यादव – ५३ किलो वजनी गट

  • निरुपमा देवी – ६१ किलो गटात

  • हरजिंदर कौर – ६९ किलो वजनी गट

ऋषिकांतच्या अनुपस्थितीमुळे पुरुष विभागातील भारताची पदक जिंकण्याची आशा मावळली असली, तरी आता संपूर्ण देशाचे लक्ष अनुभवी मीराबाई चानूसह सर्व महिला वेटलिफ्टर्सच्या कामगिरीकडे लागले आहे.(Commonwealth Silver Medalist)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >