Saturday, September 12, 2026

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद; कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद; कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, विनोद तावडे राहणार उपस्थित मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १३ आणि १४ सप्टेंबरला मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष त्याकडे लागले आहेत. रविवारी सायंकाळी ४ वाजता नरिमन पॉइंट येथील महिला विकास महामंडळ (माविम) सभागृहात ही पत्रकार परिषद होईल. त्याशिवाय रविवारी ते फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देतील. प्राच्यविद्या संशोधनाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या भेटीत शाह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सदस्यांशी संवाद साधणार असून, दुर्मीळ पोथ्यांच्या प्रदर्शनालाही ते भेट देतील. त्यानंतर सोमवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते सहभागी होतील.(Central Home Minister Amit Shah) एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा विशेष दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. शाह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मार्गी लागण्याच्या अपेक्षांना पुन्हा चालना मिळाली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबतही शाह यांच्यासमोर भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. शाह यांच्या भेटीदरम्यान संस्थेतील दुर्मीळ पोथ्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात पाच खंडांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पा. वा. काणे यांच्या ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथाचे संस्थेने जतन केलेले संदर्भसाहित्यही महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय दंड संहितेच्या उगमाशी धर्मशास्त्राचा संबंध असल्याचे मानले जात असल्याने या साहित्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एशियाटिक सोसायटीची अलीकडील निवडणूकही चर्चेत आली होती. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमारो’ या गटाने विजय मिळवला आणि भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे अध्यक्ष झाले. त्यांच्या निमंत्रणानंतर शाह यांचा संस्थेचा दौरा निश्चित झाला आहे. शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा टप्पा वाशीतील हिंदी राजभाषा संमेलनाचा असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबरपासून वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १४ आणि १५ सप्टेंबर असे दोन दिवस चालणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्याला प्रमुख उपस्थिती असेल. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या काळातच हा कार्यक्रम होत असल्याने वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दहा हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले असून, गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.(Central Home Minister Amit Shah)

दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’बाबत ते संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. ‘सेवा संकल्प अभियाना’व्यतिरिक्त ते अन्य कोणत्या राजकीय मुद्द्यांवर पत्रकार परिषदेत भाष्य करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. नरिमन पॉइंट येथील महिला विकास महामंडळ (माविम) सभागृहात ही पत्रकार परिषद होईल.(Central Home Minister Amit Shah)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >