Sunday, September 13, 2026

Asha Buchke Death : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आशाताई बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा

Asha Buchke Death : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आशाताई बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा

पुणे :  भारतीय जनता पक्षाच्या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्या, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या आशाताई दत्तात्रय बुचके (वय ५८) यांचे रविवारी (दि. १३) पहाटे ५ वाजता मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेत सलग चार वेळा सदस्य आणि गटनेत्या म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले होते; तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जुन्नर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ( Asha Buchke Death)

पुणे जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेच्या गटनेत्या असा आशा बुचके यांचा राजकीय प्रवास राहिला. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारी नेत्या म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असत. आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते किंवा गावपातळीवरील इतर प्रश्न असोत, नागरिकांनी समस्या घेऊन त्यांच्याकडे आल्यानंतर त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असत. प्रशासनाकडे लोकांचे प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत होती.

पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव होता. प्रशासकीय कामकाजाची माहिती आणि नियमांची जाण असल्यामुळे सभागृहात त्या ठामपणे आपली भूमिका मांडत असत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवर त्या आक्रमक भूमिका घेत असत. तालुक्यातील मूलभूत सुविधा, विकासनिधी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची त्यांची भूमिका अनेकदा पाहायला मिळाली.

एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो मार्गी लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ओळखल्या जात होत्या. राजकारणात अनेकदा बदलणारी समीकरणे आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप यांचा सामना करत त्यांनी आपली भूमिका कायम ठाम ठेवली.

महिला नेत्या म्हणून राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक आव्हाने समोर आली, तरीही जनतेच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवत राहिल्या. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्कही मजबूत होता.

आशा बुचके यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनतेच्या अडचणीच्या काळात धावून जाणारी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढणारी नेत्या म्हणून त्यांची आठवण कायम राहणार आहे. ( Junnar News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >