Sunday, September 13, 2026

Pakistan Terror Link : पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संशयिताला अटक; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Pakistan Terror Link : पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संशयिताला अटक; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

सातारा : मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिकाला आलेल्या धमक्यांच्या तपासाला आता पाकिस्तान कनेक्शनची धक्कादायक किनार मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३९ वर्षीय मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, त्याचे पाकिस्तानस्थित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी (LeT) संबंध असल्याचे समोर आले आहे.(Pakistan Terror Link)

व्यावसायिकाला धमक्या; तपासातून पाकिस्तान कनेक्शन

मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामानंतर व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. २१ मेपासून धमक्या येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, २२ जून रोजी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या धमकी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांचे लक्ष शफीक लोनकडे गेले.(Pakistan Terror Link)

पाकिस्तानी व्यक्तीशी सोशल मीडियावरून संपर्क?

तपासात शफीकचा ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये धमकीचे संदेश आणि व्हॉइस नोट्स तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकांशी झालेल्या संपर्काची माहिती आढळल्याचे वृत्त आहे. या डिजिटल पुराव्यांचा तांत्रिक तपास सुरू आहे.(Pakistan Terror Link)

कुटुंबातील सदस्यांचाही तपास

शफीकच्या कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचा एक भाऊ लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असून कमांडर पदावर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आता त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा, पाकिस्तानमधील संपर्कांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे. मुंबई गुन्हे शाखेने शफीककडून दोन मोबाईल फोन आणि एक डायरी जप्त केली आहे. मोबाईलमधून हटवलेला डेटा आणि संदेश पुन्हा मिळवण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या डिजिटल तपासातून आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच धमकी प्रकरणामागे नेमकी साखळी किती मोठी आहे, याचा शोध घेतला जात आहे.(Pakistan Terror Link)

दरम्यान, आरोपीविरुद्धचे आरोप आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचा दावा हा सध्या तपासाचा भाग आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून पाकिस्तानस्थित संपर्क, धमकी प्रकरणातील भूमिका आणि इतर संशयितांचा सहभाग याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.(Pakistan Terror Link)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >