Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील करंजी येथून बेपत्ता झालेल्या 85 वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येचा अखेर तब्बल 35 दिवसांनी उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि सुन्न करणारी बाब म्हणजे ज्या भाच्याला मुलाप्रमाणं मानलं त्या भाच्यानेच हत्या केल्याचा आरोप आहे. प्रशांत उत्तम माळी असं संशयित भाचा आणि आरोपीचे नाव आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेतून हा प्रकार घडल्याचा संशय असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
वैजयंती गणपत माळी ( वय 85) या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. 3 ऑगस्ट 2026 रोजी त्या आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेऊनही त्या न सापडल्यानं 9 ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत वैजयंती माळी यांचा शोध सुरू केला. तसेच 19 ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हादाखल करण्यात आला. या संपूर्ण तपासात सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांना मोठी मदत झाली. (Jalgaon Crime News)
ठाणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपावरून नरपोली पोलिसांनी २६ वर्षीय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक केली ...
सीसीटीव्ही फुटेजने केला खेळ उघड
पोलिसांनी करंजी आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईनं तपासलं. त्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 6 वाजता प्रशांत हा करंजी गावात आल्याचं तपासात निष्पन्न झालं. याचदरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैजयंती माळी या घाईघाईनं जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावल्यानंतर प्रशांतचा शोध सुरू करण्यात आला. घटनेनंतर प्रशांत तब्बल 35 दिवस फरार होता. अखेर धुळ्यातून त्याला १२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Jalgaon Crime News)
दागिन्यांच्या लोभापोटी गळा आवळून निर्घृण हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांतने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या लोभापोटी वैजयंती यांना खोटे कारण सांगून कारमध्ये बसवून नेले. त्यानंतर मुकटी परिसरात एका कापडाने गळा आवळून त्यांची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सर्व मौल्यवान दागिने काढून घेतले आणि मृतदेह लपवण्यासाठी बायपासवरील ड्रेनेजच्या सिमेंटच्या गॅपमध्ये फेकून दिला. प्रशांतने १३ सप्टेंबर रोजी दाखवलेल्या घटनास्थळावरून पोलिसांनी कुजलेले मानवी अवशेष आणि सांगाडा जप्त केला आहे. पारोळा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.