Sunday, September 13, 2026

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी चार अनारक्षित विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सावंतवाडी रोडच्या दिशेने जाणाऱ्या या विशेष गाड्या १२ आणि १३ सप्टेंबरला धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१००९ सीएसएमटीहून दुपारी १.४५ वाजता रवाना होईल. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०१० सावंतवाडी रोडहून १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सुटणार आहे. (Central Railway)

या विशेष अनारक्षित गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप यांसह एकूण २३ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. गाड्यांमध्ये १२ शयनयान डबे, सहा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असतील. प्रवाशांना अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीसोबतच ‘रेलवन’ अॅपवरूनही तिकीट बुक करता येणार आहे. (Central Railway)

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विशेष रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. १४ आणि १५ सप्टेंबरदरम्यान एकूण ३८६ गणपती विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. (Central Railway)

गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांकडून स्थानकांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. (Central Railway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >