Kanpur Murder Case : कोट्यवधी रुपयांचा औषध व्यवसाय करणारे विनीत मिनोचा यांच्या हत्येने कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे आरोपी सून शालू मिनोचा हिच्या कथित भूमिकेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन कथित मारेकऱ्यांसह विनीत मिनोचा यांची सून शालू हिलाही अटक केली आहे. सध्या ती तुरुंगात असून, तिच्या मोबाईलमधील गुगल सर्च हिस्ट्री आणि चॅट्स पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
मृत्यू हार्ट अटॅकसारखा दाखवण्याचा प्रयत्न ?
पोलिसांच्या दाव्यानुसार, हत्येपूर्वी शालूने गुगलवर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्यासारखा कसा दाखवता येईल किंवा तशा प्रकारे हत्या कशी करता येईल, यासंदर्भात सर्च केल्याचे आढळले आहे. याशिवाय, तिच्या मोबाईलमधील काही चॅट्समधून कथित हत्येच्या कटाचे संकेत मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी अद्याप सुरू असून, पुढील टप्प्यात हे पुरावे न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे.
जुन्या नोकराला लाखो रुपयांची ऑफर ?
पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शालूने घरातील जुन्या नोकराला विनीत मिनोचा यांच्या हत्येसाठी लाखो रुपयांची ऑफर दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. विनीत यांचा मृत्यू कोणालाही संशय न येता हार्ट अटॅकमुळे झाल्यासारखा दिसावा, अशा सूचना आरोपींना देण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आखलेल्या योजनेप्रमाणे घटना घडली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि त्याच्या साथीदाराने विनीत मिनोचा यांच्यावर हल्ला केला. विनीत यांनी विरोध केल्यानंतर झालेल्या झटापटीत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री चव्हाट गल्ली ...
सासऱ्यांच्या खर्चावरून कौटुंबिक वाद ?
या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. विनीत मिनोचा हे सुनेच्या खर्चांवर लक्ष ठेवत होते आणि तिच्या काही खर्चांवर आक्षेप घेत असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. विनीत यांना शालूबाबत संशय येऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या फ्लॅटमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. खर्चांवर ठेवलेली नजर आणि घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शालू सासऱ्यांवर नाराज होती, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच कौटुंबिक वादातून कथित हत्येचा कट रचला गेला असण्याची शक्यता तपासली जात आहे. विनीत मिनोचा यांच्या हत्येच्या रात्री त्यांचा मुलगा आणि सून शालू घराबाहेर पार्टीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पार्टीदरम्यान दोघांनी ड्रिंक्स घेतले, डान्स केला आणि पहाटे सुमारे तीन वाजता ते घरी परतले. यानंतर विनीत मिनोचा यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पार्टीतील त्यांची उपस्थिती, परतीची वेळ आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचाही तपास केला जात आहे.
२४ तासांत हत्येचा छडा
हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान आरोपी विशालची भूमिका समोर आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर शालू मिनोचा हिच्यावर संशय बळावला आणि तिला अटक करण्यात आली. सध्या पोलिसांकडून मोबाईल चॅट्स, गुगल सर्च हिस्ट्री, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता आणि आरोपींची भूमिका न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.






