Wednesday, September 16, 2026

Sangli Crime News : 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, न्यायालयाने दया दाखवलीच नाही ! कारण...

Sangli Crime News : 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, न्यायालयाने दया दाखवलीच नाही !  कारण...

Sangli Crime News : विहिरीत सापडलेला मृतदेह, घरात लपवलेला पुरावा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात २०१८ मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल (७०, रा. गळवेवाडी, ता. आटपाडी) याला विटा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत (District and Sessions Judge Ravikiran Bhagwat) यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी बाजू मांडली.

घरातून बेपत्ता झाली अन् दुसऱ्या दिवशी...

गळवेवाडी परिसरात ७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी चारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. (Sangli Crime News)

सहा महिने आरोपी पोलिसांच्या रडारबाहेर

या हत्येनंतर तब्बल सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र, २६ जुलै २०१८ रोजी दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शिवाजी काळेलविरोधात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान पीडित मुली आणि त्यांच्या आईचे न्यायालयात कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आले. याच जबाबातून हत्येच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. ७ जानेवारी रोजी मृत मुलगी आरोपीसोबत असल्याचे या जबाबातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काळेल याला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी केले.

आधी मृतदेह लपवला, नंतर शोध घेण्याचं नाटक

तपासात आरोपीने अत्याचारानंतर मुलीची हत्या करून मृतदेह घरातील लोखंडी कणगीत लपवल्याचे समोर आले. त्यानंतर तो नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. एवढंच नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आरोपीने या प्रकरणाचा छडा लावणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केल्याचेही तपासात समोर आले. यानंतर रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चादरीत गुंडाळलेला मृतदेह घराजवळील जगमाईच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. (Sangli Crime News)

एका टिकलीने दिला महत्त्वाचा धागा

पोलिसांनी तपासादरम्यान लोखंडी कणगी आणि चादर जप्त केली. चादरीवर पीडित मुलीची टिकली आढळली. तिच्या आजी-आजोबांनी ही टिकली ओळखली. यानंतर कोल्हापुरातील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवालही तपासात महत्त्वाचा ठरला. कणगीत मानवी रक्ताचे नमुने आढळल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तसेच अन्य न्यायवैज्ञानिक पुराव्यांमुळे पोलिसांच्या तपासाला अधिक बळ मिळाले. या पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला आणि अखेर न्यायालयाने शिवाजी काळेल याला या गंभीर प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >