Wednesday, September 16, 2026

Nashik Crime News : पत्नीशी वाद सुरू असताना आई मध्यस्थीला आली अन् मुलाने आईचाच जीव घेतला, नाशिकमध्ये क्षुल्लक कारणातून आईची हत्या

Nashik Crime News : पत्नीशी वाद सुरू असताना आई मध्यस्थीला आली अन् मुलाने आईचाच जीव घेतला, नाशिकमध्ये क्षुल्लक कारणातून आईची हत्या

Nashik Crime News : नाशिकच्या हनुमान नगर परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा अत्यंत गंभीर शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणात पिठलं न बनवल्याच्या कारणावरून पत्नीशी वाद घालत असलेल्या मुलाला समजावण्यासाठी वृद्ध आई मध्ये पडली. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आईच्याच डोक्यात टणक वस्तूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित मुलगा तानाजी आणाजी वळवी (Tanaji Anaji Valvi) याला ताब्यात घेतले असून, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (Gangapur Police Station) दाखल करण्यात आला आहे.

पिठलं न बनवल्याच्या कारणावरून वाद

ही घटना मोतीवाला कॉलेजच्या मागील हनुमान नगर परिसरात मंगळवारी (१५ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव कमलाबाई आणाजी वळवी (वय ८०) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी वळवी (Tanaji Anaji Valvi) याला दारूचे व्यसन असल्याची माहिती आहे. घटनेच्या रात्री ‘जेवणात पिठलं का बनवलं नाही?’ या क्षुल्लक कारणावरून त्याचा पत्नीशी वाद सुरू झाला. वाद वाढत असल्याचे पाहून कमलाबाई यांनी पती-पत्नीमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तानाजीने आईवरच राग काढल्याचा आरोप आहे. (Nashik Crime News)

टणक वस्तूने डोक्यात वार

पोलिसांच्या माहितीनुसार, नशेत असलेल्या तानाजीने कमलाबाई यांच्या डोक्यात कोणत्यातरी टणक वस्तूने गंभीर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. हल्ल्यानंतरही कमलाबाई यांच्याकडे वेळीच लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांची नात सोनाली गजानन डंबाळे आणि नातू दीपक भगवान गावीत यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.(Nashik Crime News)

उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कमलाबाई वळवी यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित तानाजी वळवी (Tanaji Anaji Valvi) याला ताब्यात घेतले असून, हल्ल्याचे नेमके कारण, घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा पोलीस (Gangapur Police Station) तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >