Wednesday, September 16, 2026

Nitin Nabin : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा पहिला मुंबई दौरा; सिद्धिविनायक आणि ‘लालबागच्या राजा’चे घेतले दर्शन

Nitin Nabin : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा पहिला मुंबई दौरा; सिद्धिविनायक आणि ‘लालबागच्या राजा’चे घेतले दर्शन

मुंबई : महाराष्ट्राच्या सुरम्य सांस्कृतिक वातावरणात आणि गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026) मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांचे बुधवारी प्रथमच मुंबईत आगमन झाले. पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतरच्या या पहिल्यावहिल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर आणि प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या संपूर्ण दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

मुंबईत आगमन होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितीन नबीन यांचे जंगी स्वागत केले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणानिमित्त दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. "गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे आपल्या राज्याचे सांस्कृतिक प्राण आहेत. नबीन यांच्या या उपस्थितीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये नवा उत्साह संचारला आहे," असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच, गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे पर्व सुरू असून सण-उत्सव अत्यंत दिमाखात साजरे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी संपूर्ण देश आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. "गणेशोत्सवाच्या या पावन काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत येण्याचे भाग्य मला लाभले. 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष हा भारताच्या समृद्ध संस्कृतीचा खरा आत्मा आहे. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंदिर दर्शनानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन राज्यातील गणेशोत्सवाच्या वातावरणाचा आनंद लुटला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >