मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Murder Case) यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBIकडून सुरू करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने या प्रकरणात FIR दाखल केली आहे. FIR मध्ये अनेक व्यक्तींची नावे नमूद असून, त्यांची भूमिका तपासण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या टप्प्यावर संबंधित व्यक्तींना आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
दिशा सालियन प्रकरणात नेत्यांसह अधिकाऱ्यांचीचाही समावेश
CBIच्या FIRमध्ये शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, रोहन रॉय यांच्यासह काही माजी पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची नावे नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे. या सर्वांच्या भूमिकेचा तपास केला जाणार आहे. तपासादरम्यान पुरावे आणि तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने तपासादरम्यान कोणालाही पुरेसा पुरावा मिळेपर्यंत आरोपी म्हणून पाहू नये, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे FIRमध्ये नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी किंवा आरोपी असल्याचे मानले जात नाही. CBIकडून कागदपत्रे, जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जाणार आहे.
दिशा सालियन प्रकरण CBIच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्यावर
या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी CBIच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्या सध्या CBIच्या स्पेशल क्राईम्स युनिटमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी संवेदनशील आणि चर्चेत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात काम केले आहे. त्यांच्यासोबत तपास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचे पथक काम करणार आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या रात्री त्यांच्या होणाऱ्या पती रोहन रॉय यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाबही CBIकडून नोंदवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय घटनास्थळाची पाहणी, आधीच्या तपासातील कागदपत्रांची तपासणी, पोलिसांचे जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले जाणार आहे.
आत्महत्या की घातपात ?
दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या तपासात हा मृत्यू आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत नव्याने तपासाची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला आहे.






