मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेमची भेट घेतल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या भेटीची चौकशी करण्याबरोबरच खान यांना पदावरून हटवावे आणि प्रकरणाची सीबीआय तसेच एनआयएमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात विहिंपकडून नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.
संवेदनशील घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे गंभीर बाब असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. अबू सालेमला भेटण्यामागील कारण काय होते, भेटीचे स्वरूप काय होते आणि या भेटीत कोणती चर्चा झाली, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
- विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन जगभरातील पर्यटकांना ...
दरम्यान, प्यारे खान यांनी यापूर्वी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपण कारागृहांना भेटी देत असून, नाशिक कारागृहाच्या भेटीदरम्यान अबू सालेमने त्याची शिक्षा पूर्ण झाल्याने सुटकेची मागणी केल्याचे खान यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात कारागृह अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, सालेमशी संबंधित प्रकरणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या सुटकेचा निर्णय न्यायालयाच्या निकालानंतरच होईल, असे खान यांनी स्पष्ट केले होते. कारागृहाला भेट दिल्यानंतर तेथील तक्रारी किंवा निवेदने स्वीकारणे हा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आपल्या अधिकाराचा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
मात्र, विहिंपने या स्पष्टीकरणावर समाधान न मानता भेटीच्या उद्देशाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. खान यांनी आपल्या घटनात्मक पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील तथ्य आणि भेटीमागील नेमकी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी विहिंपने केली आहे.