Wednesday, September 16, 2026

Pune Fire News : बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटुंब बाहेर गेलं अन् इकडे घराला भीषण आग लागली, नेमकं काय घडलं ?

Pune Fire News : बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटुंब बाहेर गेलं अन् इकडे घराला भीषण आग लागली, नेमकं काय घडलं ?

Pune Fire News : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबीयांच्या मागे बंद असलेल्या फ्लॅटमधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी फ्लॅटचा काही भाग व्यापला. वानवडी परिसरातील सिद्धार्थ हाइट्स इमारतीच्या सातव्या मजल्यावर सोमवारी (१५ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६ वाजता ही घटना घडली. बंद घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसताच संपूर्ण सोसायटीत एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

देवघराशेजारील सामानाने पेट घेतला

माहिती मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता देवघराशेजारी ठेवलेले टेबल आणि त्यावरील लाकडी पाट पेटल्याचे आढळले. देवघरातील दिव्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीची झळ देवघरापर्यंत पोहोचली होती. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली. वेळीच आग आटोक्यात आल्याने संपूर्ण फ्लॅट जळून खाक होण्याचा मोठा अनर्थ टळला.

घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली

आग लागली त्यावेळी घरातील सर्वजण गणपती विसर्जनासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दीपक कचरे तसेच फायरमन मोहन सणस, सागर नेवगे, पृथ्वीराज खेडेकर आणि शिवकुमार दीक्षित यांनी तत्परतेने कारवाई करत आग नियंत्रणात आणली. गणेशोत्सवाच्या काळात घरांमध्ये दिवे, उदबत्त्या, विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारची सजावट केली जाते. त्यामुळे घर काही काळासाठी बंद करून बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >