Marathwada Special : मराठवाडा विशेष ! 17 सप्टेंबरचा स्वातंत्र्यसंग्राम ते आजचा मराठवाडा; जाणून घ्या या भूमीची संपूर्ण कहाणी

Marathwada Special : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला... पण भारताचा एक भाग असा होता, ज्याला स्वातंत्र्यासाठी आणखी १३ महिने संघर्ष करावा लागला. हा प्रदेश म्हणजे मराठवाडा! १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं आणि मराठवाड्याच्या मुक्तीचा नवा अध्याय सुरू झाला. त्यामुळेच १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर संघर्ष, स्वाभिमान आणि मुक्तीची आठवण करून देणारा दिवस आहे.



हैदराबाद संस्थानाचा भाग होता मराठवाडा


स्वातंत्र्यपूर्व भारतात ३५० हून अधिक संस्थानं होती. त्यापैकी एक मोठं संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान. आजचा मराठवाडा हा त्याच हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता. पुढे १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला. आज भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या मराठवाड्याच्या पूर्वेला विदर्भ, पश्चिमेला पश्चिम महाराष्ट्र, उत्तरेला खान्देश तर दक्षिणेला तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये आहेत. एकूण ८ जिल्हे आणि ७६ तालुके असलेला हा प्रदेश सुमारे ६४ हजार ५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला आहे. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाडा विभागाचे प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे.



गोदावरीमुळे ‘गंगथडी’ची ओळख


नाशिकमधून प्रवास सुरू करणारी गोदावरी नदी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या भागातून पुढे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाते आणि अखेर बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरीला दक्षिण भारताची गंगा मानलं जात असल्याने मराठवाड्याला ‘गंगथडीचा प्रदेश’ अशीही ओळख मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक आहे.



इतिहास आणि पर्यटनाचा अनोखा ठेवा


मराठवाडा म्हटलं की इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी दिसतात. अजिंठा आणि वेरुळ लेणी, वेरुळमधील कैलास मंदिर, कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, दौलताबादचा किल्ला, अंतुरचा किल्ला यांसारखी अनेक ऐतिहासिक स्थळं या प्रदेशाची ओळख आहेत. वेरुळचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, नांदेडमधील हुजूर साहिब गुरुद्वारा, तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, खुल्ताबाद परिसरातील सूफी संतांची परंपरा अशा विविध धार्मिक स्थळांमुळे मराठवाड्यात धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचं अनोखं चित्र पाहायला मिळतं. अजिंठा आणि वेरुळ लेण्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे.



संतांची भूमी म्हणूनही ओळख


मराठवाड्याची ओळख केवळ किल्ले आणि लेण्यांपुरती मर्यादित नाही. ही भूमी संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. पैठणजवळील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला, तर पैठण ही संत एकनाथांची कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेडशी संत जनाबाईंचं नाव जोडलं जातं. अंबाजोगाईचे संत मुकुंदराज यांना मराठीतील आद्यकवींमध्ये स्थान दिलं जातं. हिंगोली जिल्ह्यात जन्मलेल्या संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका उत्तर भारतापर्यंत पोहोचवली. त्यांच्या अभंगांचाही समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे.



शिवरायांच्या इतिहासाशीही नातं


छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रमुख कार्यक्षेत्र पुणे आणि कोकण परिसरात होतं. मात्र त्यांच्या वडिलांचं, शहाजीराजांचं मूळ गाव वेरुळशी संबंधित असल्याचं इतिहासात नमूद केलं जातं. आजही वेरुळ परिसरात मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात.



उद्योग आणि अर्थव्यवस्थेतही महत्त्वाचं स्थान


मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वेगळी ओळख आहे.छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक वारशासोबतच औद्योगिक विकासासाठीही महत्त्वाचं केंद्र आहे. शहराला ‘५२ दरवाजांचं शहर’ म्हणूनही ओळखलं जातं.जालना हे बियाणे उद्योग आणि स्टील उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर लातूर कृषी व्यापारासाठी महत्त्वाचं केंद्र असून, येथील बाजारपेठेचा सोयाबीनसह विविध कृषी उत्पादनांच्या व्यापारात मोठा वाटा आहे.



शिक्षणाच्या क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा


स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे किंवा हैदराबाद गाठावं लागत होतं.१९५० मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठामुळे मराठवाड्यासोबतच शेजारील भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अधिक खुली झाली. पुढे विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी मोठा संघर्ष झाला. तब्बल १६ वर्षांच्या आंदोलनानंतर विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.



महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्याचा प्रभाव


राजकारणाच्या पटलावरही मराठवाड्याने महाराष्ट्राला अनेक मोठे नेते दिले. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. तर सुंदरराव सोळंके आणि गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. राष्ट्रीय राजकारणातही मराठवाड्याचा ठसा उमटला. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सूर्यकांता पाटील आणि रावसाहेब दानवे यांनी केंद्रात मंत्री म्हणून काम केलं आहे. राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारीही हरीभाऊ बागडे यांनी स्वीकारली आहे.



संघर्षापासून विकासापर्यंतचा प्रवास


१७ सप्टेंबर १९४८ ला मिळालेल्या मुक्तीपासून आजपर्यंत मराठवाड्याने मोठा प्रवास केला आहे. इतिहास, संतपरंपरा, धार्मिक स्थळं, जागतिक वारसा, उद्योग, शेती, शिक्षण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा हा प्रदेश म्हणजे मराठवाडा. म्हणूनच मराठवाड्याची कहाणी केवळ एका प्रदेशाची कहाणी नाही... ही आहे संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका भूमीची कहाणी!

Comments
Add Comment

Weather Update : राज्यात पावसाची पूर्ण उघडीप! 17 सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा? जाणून घ्या हवामान खात्याने काय दिला इशारा...

Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Maharashtra Government : रेशन कार्डापासून परवान्यांपर्यंत सेवा होणार जलद; अन्न व नागरी पुरवठा विभागात GPR अंतर्गत मोठ्या सुधारणा

मुंबई : नागरिकांना शासकीय सेवा अधिक पारदर्शक, सुलभ, कालबद्ध आणि डिजिटल पद्धतीने मिळाव्यात, यासाठी अन्न, नागरी

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रलंबित विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच

Kolhapur News : कळंबा कारागृहात कैद्यांचा उच्छाद; गोंधळ रोखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा जणांचा हल्ला, दगडफेकीत हाताला दुखापत

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात गोंधळ घालणाऱ्या कैद्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ तुरुंग

Devendra Fadnavis : नवोन्मेषाच्या बळावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या स्टार्टअप आणि इनोव्हेशन व्हिजनचे जागतिक व्यासपीठावर

Maharashtra Weather Update : १७ सप्टेंबरला राज्यात हवामानाचा मिश्र अंदाज; काही जिल्ह्यांत पाऊस तर विदर्भात कोरड्या वातावरणाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात १७ सप्टेंबर रोजी हवामानात विभागनिहाय बदल जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांत