Friday, September 18, 2026

Chhatrapati Sambhajinagar News : गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्या, अन् भयानक घडलं; १३ मुलांना...

Chhatrapati Sambhajinagar News : गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्या, अन् भयानक घडलं; १३ मुलांना...

Chhatrapati Sambhajinagar News : गणेशोत्सवाच्या उत्साहात गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने 13 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव येथे ही घटना घडली. मुलांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात (Vaijapur Sub-District Hospital) दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

गणपती बसवला, आरती केली अन् प्रसादासाठी...

मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने गावातील काही मुलांनी एकत्र येत मातीची गणपतीची मूर्ती बसवली होती. त्यानंतर सर्वांनी गणपतीची आरती केली. आरती झाल्यानंतर प्रसादासाठी त्यांच्याकडे कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध नव्हता. त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या एरंडाच्या बिया मुलांनी प्रसाद म्हणून खाल्ल्या. मात्र, काही वेळातच त्यांना त्रास जाणवू लागला.

एकाच वेळी अनेक मुलांना उलट्या

एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या. काही मुलांना अस्वस्थताही जाणवू लागल्याने कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व मुलांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात (Vaijapur Sub-District Hospital) दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मुलांवर उपचार सुरू केले. एकाच वेळी 13 मुलांना त्रास झाल्याने वैद्यकीय यंत्रणेकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनोळखी बिया किंवा वनस्पती खाणे टाळण्याचे आवाहन

या घटनेमुळे लहान मुलांनी परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही अनोळखी बिया, फळे किंवा वनस्पतींचे भाग खाद्य आहेत की नाहीत याची माहिती नसताना खाणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आणि अनोळखी बिया किंवा वनस्पतींचे भाग खाण्यापासून त्यांना रोखणे गरजेचे आहे. सध्या सर्व 13 मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >