Nashik Crime News : नाशिकच्या गंगापूर रोडवर रात्रीच्या अंधारात दुभाजकावरील झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाहिरात फलक स्पष्ट दिसावा यासाठी तब्बल 50 विदेशी झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत गंगापूर पोलिसांनी ( Gangapur Police Station ) 'नम्रता ॲडव्हर्टायझिंग'च्या संचालकासह सहा जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सीसीटीव्हीमुळे प्रकाराचा पर्दाफाश
गंगापूर रोडवरील दुभाजकावर लावण्यात आलेली अनेक झाडे अचानक गायब झाल्याने हा प्रकार समोर आला. यानंतर गंगापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान काही मजूर रात्रीच्या वेळी झाडे तोडताना दिसून आले. त्यानंतर तोडलेली झाडे मालवाहू वाहनात भरून नेण्यात आल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. त्याआधारे पोलिसांनी तांत्रिक तपास करत संबंधितांपर्यंत पोहोचत कारवाई केली.
जाहिरात फलकासाठी झाडे तोडल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, रस्त्यावरील जाहिरात फलक प्रवाशांना स्पष्ट दिसावा आणि झाडांमुळे जाहिरातीला होणारा अडथळा दूर व्हावा, या उद्देशाने झाडे तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 'नम्रता ॲडव्हर्टायझिंग'चे संचालक मच्छिंद्र विजय देशमुख (44) यांच्यासह पाच मजुरांना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही पावसाची प्रतीक्षा करत होते. आता ...
अटक करण्यात आलेले सहा आरोपी
1. मच्छिंद्र विजय देशमुख (44) – संचालक, नम्रता ॲडव्हर्टायझिंग
2. अभिमन काशिनाथ खैरनार (37)
3. दिलीप सदू बेंडकुळे (34)
4. दीपक संतोष दाते (25)
5. रोहिदास पांडुरंग खुरखुटे (45)
6. अर्जुन दत्तू चारोस्कर (38)
सर्व आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शहरातील इतर भागांतही तपास
या घटनेनंतर नाशिक महापालिका प्रशासन ( Nashik Municipal Corporation Administration ) आणि पोलीस शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारे जाहिरात फलकांसाठी अनधिकृत वृक्षतोड करण्यात आली आहे का, याचा तपास करत आहेत. दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असतानाच हा प्रकार समोर आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.





