Friday, September 18, 2026

Gondhal Marathi Movie : ना कट, ना ब्रेक… तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन! ‘गोंधळ’मधील या सीनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Gondhal Marathi Movie : ना कट, ना ब्रेक… तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन! ‘गोंधळ’मधील या सीनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

महाराष्ट्राच्या मातीतील ‘गोंधळ’ची ऑस्करवारी चांगलीच गाजतेय!

मुंबई : महाराष्ट्राची परंपरा, मानवी नात्यांतील गुंतागुंत आणि थरार यांचा अनोखा संगम असलेला ‘गोंधळ’ चित्रपट सध्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले असून, आता ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Gondhal Marathi Movie)

परंपरा, नाती आणि थराराची कथा

‘गोंधळ’मध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची पार्श्वभूमी घेत मानवी भावभावना, नात्यांमधील ताणतणाव आणि बदलत्या परिस्थितींचा वेध घेण्यात आला आहे. नाट्य आणि थराराचा संगम, प्रभावी व्यक्तिरेखा आणि त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. (Gondhal Marathi Movie)

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर

‘गोंधळ’ला आतापर्यंत विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण असे दोन पुरस्कार मिळाले. तसेच २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार चित्रपटाला मिळाला. (Gondhal Marathi Movie)

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)च्या इंडियन पॅनोरमा विभागात दिग्दर्शकाला सिल्व्हर पिकॉक पुरस्कार मिळाला. याशिवाय झी चित्र गौरव पुरस्कार २०२६मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कारही ‘गोंधळ’च्या नावावर झाले.

ऑस्करसाठी भारताची अधिकृत निवड

आता ‘गोंधळ’ची ऑस्कर २०२७च्या Best International Feature Film श्रेणीसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली. यंदा भारताकडून एकूण ३३ चित्रपटांचा विचार करण्यात आला होता. त्यात १४ हिंदी, मराठी, तेलुगू आणि गुजराती भाषेतील प्रत्येकी चार, तमिळमधील तीन, तर मल्याळम आणि नागामी भाषेतील प्रत्येकी एका चित्रपटाचा समावेश होता. एका मूकपटाचाही विचार करण्यात आला होता. (Gondhal Marathi Movie)

२५ मिनिटांचा वनटेक सीन ठरतोय खास

‘गोंधळ’ची आणखी एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे चित्रपटातील तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन. पहिल्या भागात असलेला हा प्रसंग कोणताही कट न करता सलग चित्रित करण्यात आला आहे. या दृश्यासाठी संपूर्ण टीमने तब्बल सात दिवस सराव केला होता. त्यामुळे हा प्रयोग चित्रपटाच्या तांत्रिक मांडणीतील महत्त्वाचा भाग ठरतो.

वनटेक शैलीचा प्रभाव यापूर्वी Birdman आणि 1917 यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही दिसला आहे. त्यामुळे ‘गोंधळ’मधील या प्रयोगाचीही विशेष चर्चा होत आहे. (Gondhal Marathi Movie)

याआधी तीन मराठी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

‘गोंधळ’पूर्वी ‘श्वास’ (२००४), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) आणि ‘कोर्ट’ (२०१५) या तीन मराठी चित्रपटांची भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. आता या यादीत ‘गोंधळ’ची भर पडली आहे.

मात्र, भारताची अधिकृत प्रवेशिका होणं म्हणजे थेट ऑस्कर नामांकन मिळणं नाही. पुढील निवड प्रक्रियेत चित्रपटाला स्थान मिळवावं लागणार आहे. त्यामुळे ‘गोंधळ’चा पुढील ऑस्कर प्रवास आणि २५ मिनिटांच्या वनटेकची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी दखल याकडे आता मराठी चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे. (Gondhal Marathi Movie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >