पुण्यातील पेठ परिसरामध्ये जर तुम्ही गणेशोत्सवासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुम्हाला कदाचित पार्किंगची समस्या उद्भवू शकते. पुणे वाहतूक पोलिसांनी गणेशभक्तांची अलोट गर्दी आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सहा प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंगसाठी सक्त मनाई केली आहे. सायंकाळी ५ नंतर मध्य पुण्यातील पेठ परिसरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंगसाठी पूर्ण बंदी असणार आहे. शहरातील वाहतूक पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून या नव्या नियमावलीची माहिती दिली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोणत्या रस्त्यांवर पार्किंगला बंदी आहे?
शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई चौक
शिवाजी रस्त्यावरील मंडई ते शनिपार चौक
बाजीराव रस्त्यावरील शनिपार चौक ते फुटका बुरूज
बाजीराव रस्त्यावरील आप्पा बळवंत चौक ते मोती चौक
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक
शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक
वाहतूक कोंडी वाढल्यास काही रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू केली जाण्याची शक्यता आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी एकेरी रस्ता आहे, जर वाहतूक कोंडी झाली तर, एकेरी रस्त्यावरून दुहेरी वाहतूक तात्पुरत्या पद्धतीने केली जाण्याची शक्यता आहे. कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, नाईक रस्ता आणि जंगली महाराज रस्ता ह्या रस्त्यांवरून एकेरी वाहतूक केली जाते. सायंकाळी ५ नंतर जर ह्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आढळल्यास दोन्हीही बाजूंची वाहतूक सुरू केली जाईल. रूग्णवाहिका, पोलीसांचे वाहन आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे नियम नसणार आहेत.