Saturday, September 19, 2026

Jalgaon : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन्... जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन्... जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना जयदीप मेघराज नेमाडे याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. गुदमरण्याचा त्रास होत असल्याचं त्याने मित्रांना सांगितल्यानंतर तो रांगेतून बाहेर पडला. मात्र, काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर झाली. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही घटना 17 सप्टेंबर रोजी रात्री घडली.

दर्शनाच्या रांगेत अचानक प्रकृती बिघडली

दरवर्षीप्रमाणे यंदाही जयदीप मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता. दर्शनासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक त्रास जाणवू लागला. गुदमरण्याचा त्रास होत असल्याने त्याने मित्रांना याची माहिती दिली आणि रांगेतून बाहेर पडला. त्याची प्रकृती खालावत असल्याचं लक्षात आल्यानंतर तेथील पोलिसांनी तातडीने मदत केली. जयदीपला मदत कक्षात नेण्यात आलं आणि त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.

पुण्यात करत होता नोकरी

जयदीप हा जळगावमधील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर MBA केलं होतं. शिक्षणानंतर तो पुण्यात नोकरी करत होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मित्रांसोबत मुंबईत येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा त्याचा यंदाचाही बेत होता. मात्र, दर्शनाच्या रांगेतच त्याच्यावर काळाचा घाला आला. जयदीपच्या आईचं 12 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या जयदीपच्या अचानक मृत्यूने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने त्याच्या नातेवाईक, मित्र आणि परिचितांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >