Nashik Crime : नांदगाव तालुक्यातून आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मन्याड चौकी परिसरात 17 तारखेच्या मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असताना चिमुकली अचानक गायब झाली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंथरुणातून चिमुकली गायब
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास चिमुकली आई-वडिलांसोबत झोपली होती. मात्र, मध्यरात्रीनंतर ती अंथरुणातून गायब झाल्याचे सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. चिमुकलीच्या वडिलांनी नांदगाव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे.
Nashik : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा मोसम नदीच्या बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नामपूर येथील एका खासगी कोचिंग ...
पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिसांचे पथक चिमुकलीचा शोध घेत आहे. परिसरातील घरे, शेतजमीन, जंगलाचा भाग तसेच आसपासच्या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, अद्याप चिमुकलीचा ठोस माग लागलेला नाही. दरम्यान, चिमुकलीच्या कुटुंबीयांना एका व्यक्तीवर संशय असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या व्यक्तीने आरोपांनंतर स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेचा आणि चिमुकलीच्या बेपत्ता होण्याचा थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
चिमुकली कुठे गेली ?
अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाचे मध्यरात्री घरातून गायब होणे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. चिमुकलीला कोणी घरातून नेले का, ती घराबाहेर कशी गेली किंवा या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, चिमुकलीबाबत कोणतीही संशयास्पद किंवा महत्त्वाची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. सध्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू असून, या प्रकरणातील सत्य तपासातूनच समोर येणार आहे.





